Virender Sehwag On MS Dhoni Batting Order : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा स्टार खेळाडू एमएस धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. माही फलंदाजीसाठी आला तोपर्यंत सामना चेन्नई सुपर किंग्जच्या हाताबाहेर गेला होता. त्याने शेवटच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारला. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, जर तुम्ही आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा स्कोअरकार्ड पाहिला तर तुम्हाला कळेल की धोनीने सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा केल्या.

आता प्रश्न असा आहे की, जेव्हा एमएस धोनीत अजूनही मोठे षटकार मारण्याची क्षमता ठेवतो, तर तो इतका खाली फलंदाजी का करतो? सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर जेव्हा माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागला क्रिकबझ शोमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने एक मजेदार उत्तर दिले.

वीरेंद्र सेहवागनं उडवली धोनीची खिल्ली! 

जेव्हा वीरेंद्र सेहवागला विचारण्यात आले की, एमएस धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? वीरू गमतीने म्हणाला, "तो लवकर आला होता, तो आला तेव्हा 16 षटके झाली होती, तो सहसा 19 व्या षटकात फलंदाजी करायला येतो." एकतर धोनी लवकर आला किंवा त्यांच्या फलंदाजांनी लवकर विकेट गमावल्या.

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, मला वाटतं की कदाचित एमएस धोनी किंवा सीएसके संघ व्यवस्थापनाने ठरवलं असेल की तो फक्त इतक्या षटकांमध्येच फलंदाजी करेल. तुम्ही लवकर बाहेर पडाल की उशिरा, ते तुमच्या हातात आहे. त्याला फक्त 18 व्या किंवा 19 व्या षटकातच यायचे आहे. आज तो दोन ओव्हर आधी आलो, फरक एवढाच आहे.

सेहवाग म्हणाला की, मला याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. आपण जे बोलतो त्यामुळे काहीही होत नाही. आम्ही गेल्या 3-4 वर्षांपासून म्हणत आहोत की धोनीने पुढे यावे. तो भारतीय संघाकडून खेळला तरीही तो कधीही चौथ्या क्रमांकावर आला नाही, आता तो निवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचला आहे, तो आपले कसे ऐकेल?

त्याच शोमध्ये वीरेंद्र सेहवागसोबत उपस्थित असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनीही एमएस धोनीवर निशाणा साधला. तो म्हणाला की, हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. जेव्हा तो 16 चेंडूत 30 धावा काढू शकतो आणि नाबाद राहू शकतो, तेव्हा तुम्ही फलंदाजी करून सामना जिंकण्याचा प्रयत्न का करत नाही?