PBKS vs KKR, IPL 2023 :  आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात पंजाबने कोलकात्याचा सात धावांनी पराभव केला आहे. डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबने कोलकतात्याचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात उमेश यादव याने डेवेन ब्राव्हो आणि सुनील नारायण यांचा विक्रम मोडीत काढला. एकाच संघाविरोधात सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड आता उमेश यादवच्या नावावर जमा झालाय. उमेश यादव याने आयपीएलमध्ये पंजाबविरोधात 34 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. याआधी हा विक्रम ब्राव्हो आणि सुनील नारायणच्या नावावर होता. 


डेवेन ब्राव्हो याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरोधात (MI) 33 विकेट घेतल्या आहेत. तर  सुनील नारायण याने पंजाबविरोधात 33 विकेट घेतल्या होता. आज हा विक्रम उमेश यादव याने मोडीत काढला. उमेश यादवच्या नावावर आता पंजाबविरोधात 34 विकेट आहेत. एकाच संघाविरोधात सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये लसिथ मिलंगाचाही समावेश आहे. मुंबईकडून खेळताना मलिंगाने चेन्नईविरोधात 31 विकेट घेतल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमार याने कोलकाताविरोधात 30 विकेट घेतल्या आहेत. 






उमेश यादवचे IPL करिअर


उमेश यादव याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 2010 मध्ये पदार्पण केले होते. पहिला सामना तो चेन्नईविरोधात खेळला होता. उमेश यादव याने आयपीएल करिअरमध्ये 134 सामने खेळले आहेत. उमेश यादव याने 472 षटके गोलंदाजी करताना 136 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान यादवची सरासरी 29 इतकी राहिली आहे. तर त्याने प्रति षटके 8.35 धावा खर्च केल्या आहे. 23 धावा देऊन चार विकेट ही सर्वोत्तम कामगिरी त्याने आयपीएलमध्ये केली आहे. 35 वर्षीय उमेश यादव याने तीन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. 


गेल्या हंगामात उमेश यादवची कामगिरी कशी होती ?


आयपीएलच्या 15 व्या हंगामात उमेश यादव याने झकास प्रदर्शन केले होते. 12 सामन्यात 7 च्या इकॉनॉमीने त्याने 16 विकेट घेतल्या होत्या. एक वेळा चार विकेट घेण्याचा कारनामाही त्याने केला होता.


पंजाबविरोधात आज कशी होती उमेशची कामगिरी - 


मोहालीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात उमेश यादव याने धारधार गोलंदाजी केली होती. उमेश यादव याने चार षटकात 27 धावा खर्च करत एक विकेट घेतली. धोकादायक भानुका राजपक्षे याला उमेश यादव याने रिंकू सिंह याच्याकरवी झेलबाद केले होते. 


कोलकात्याचा पराभव -
आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात पंजाबने कोलकात्याचा सात धावांनी पराभव केला आहे. डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबने कोलकतात्याचा सात धावांनी पराभव केला. पंजाबने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचला होता. पण चार षटके बाकी असताना पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळेच डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबला सात धावांनी विजय देण्यात आले. भानुका राजपक्षे आणि अर्शदीप सिंह पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भानुका राजपक्षे याने अर्धशतक झळकावले तर गोलंदाजीत अर्शदीपने तीन विकेट घेतल्या.