IPL 2023 Auction: इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) याने पाकिस्तानविरोधात कसोटी सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. ब्रूकने पाकिस्तान दौऱ्यात आतापर्यंत तीन शतकं झळकावली आहेत. तिन्ही कसोटी सामन्यात ब्रूकने शतकी खेळी केली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ब्रूकने आठ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने 111 धावांचा पाऊस पाडलाय. ब्रूक इंग्लंड संघाकडून जास्तीत जास्त टी २० सामन्यात खेळताना दिसतो. पण ब्रूकला कसोटीत संधी मिळाली. त्याने त्या संधीचं सोनं केलं. कसोटीतही ब्रूकने टी२० स्टाईलने फलंदाजी केली आहे. ब्रूकची ही कामगिरी पाहाता आगामी आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
मिनी ऑक्शनमध्ये राहणार सर्वांची नजर -
मिनी ऑक्शन 2022 मध्ये आयपीएलच्या सर्व संघाचं इंग्लंडच्या विस्फोटक ब्रूक याच्यावर लक्ष असणार आहे. ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडसाठी एकूण 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामधील 17 डावात त्याने 137.78 च्या स्ट्राइक रेटने 372 धावा केल्या आहेत. यामध्ये 81 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. 23 वर्षीय ब्रूक मिनी ऑक्शनमध्ये मालामाल होण्याची शक्यता आहे. त्याने आपलं नाव लिलावासाठी दिलं आहे. ब्रूक कसोटीमध्ये टी२० स्टाइलने फलंदाजी करत आहे. आयपीएल लिलावाआधी ब्रूकने केलेल्या विस्फोटक फलंदाजीमुळे मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
कसं आहे ब्रूकचं आंतरराष्ट्रीय करिअर -
ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत. त्याशिवाय 20 टी20 सामन्यातही प्रतिनिधित्व केलेय. टी20 सह कसोटीमध्येही ब्रूकची दमदार कामगिरी दिसत आहे. कसोटीतील सहा डावात ब्रूकने तीन शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. 480 धावांचा पाऊस त्याने पाडलाय.
कोचीमध्ये आयपीएलचा लिलाव -
यंदाचा आयपीएल लिलाव (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित केला आहे. या मिनी लिलावासाठी जवळपास सर्व फ्रँचायझीने तयारी केली आहे. या लिलावात 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 21 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे 273 खेळाडू आहेत. इंग्लंडच्या 27 खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका 22 खेळाडू, वेस्ट इंडिज 20 खेळाडू, न्यूझीलंड 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे चार खेळाडू, झिम्बाब्वेचे दोन खेळाडू, नामिबियाचे दोन खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. कोची येथे होणाऱ्या लिलावाकडे सर्व क्रीडा जगताचे लक्ष लागलेय.