Ben Stokes On IPL : इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी बेन स्टोक्सची निवड झाली आहे. माजी कर्णधार जो रुटच्या जागी स्टोक्सची निवड करण्यात आली आहे. इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्टोक्स म्हणाला की, आता मी संघाचा पूर्णवेळ कर्णधार झालो आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर कसे आणायचे याकडे माझे संपूर्ण लक्ष आहे. त्यामुळे गरज पडली तर बेन स्टोक्स आयपीएल खेळणार नाही, त्याच्या वक्तव्यावरुन संकेत मिळत आहेत.
जो रूट इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार असताना बेन स्टोक्स उपकर्णधारपदाची धुरा सांभाळत होता. यादरम्यान रुट संघाबाहेर असताना स्टोक्स संघाच्या कर्मपदाची धुरा सांभाळत होता. मात्र, आता त्याच्याकडू पूर्णवेळ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इंग्लंडला पुन्हा विजयी मार्गावर आणणार : स्टोक्स
स्टोक्सने आयपीएल 2022 च्या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. कारण स्टोक्सची इंग्लंडकडून कसोटीतील कामगिरी खूपच खराब होती, त्यानंतर त्याने आयपीएलऐवजी कौंटी खेळण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड कसोटी संघाने मागील 4 मालिकांमध्ये 3 मालिका गमावल्या आहेत. अशा स्थितीत इंग्लंडला विजयी मार्गावर परत आणणे सोपे नाही. हे मोठे आव्हान असल्याचे बेन स्टोक्सने म्हटले आहे.
कसोटी क्रिकेटला माझे पहिले प्राधान्य : स्टोक्स
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर स्टोक्स म्हणाला की, इंग्लंड क्रिकेटमध्ये खूप काही बदल करण्याची गरज आहे. हे बदल मैदानावर तसेच मैदानाबाहेरही होतील. दरम्यान, एवढ्या व्यस्त वेळापत्रकात मर्यादित षटकांचे क्रिकेट आणि आयपीएलमध्ये संतुलन कसे साधणार असा प्रश्न बेन स्टोक्सला विचारण्यात आला, त्यावेळी तो म्हणाला की, माझ्यासाठी कसोटी क्रिकेटला प्रथम प्राधान्य आहे. माझ्यासाठी सध्याचा काळ खूप आनंदाचा आहे. पण एक आव्हानही आहे. गेल्या काही वर्षांत जे काही घडले त्याचा मला फारसा फरक पडत नाही, असे स्टोक्स म्हणाला. मला फक्त वर्तमानावर काम करायचे आहे. वाईट काळातून आपण झपाट्याने बाहेर पडत असल्याचे स्टोक्स म्हणाला.