SRH vs LSG Weather Report And Forecast : सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आज आमनासामना होणार आहे. हा आयपीएलचा 57 वा सामना असेल. हा सामना लखनौ आणि हैदराबाद संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. पण या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून हैदराबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी तर सगळ्या मैदानावर पाणीच पाणी झाले होते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे हा सामना रद्द होणार का? या चर्चेला पेव फुटले आहे. आजही सामन्यावेळी हैदराबादमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्यावेळी जोरदार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जर पावसाने धुमाकूळ घातला तर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द होऊ शकतो. 


हैदराबादमध्ये आज कसं असेल हवामान -


हवामान विभागाच्या रिपोर्ट्सनुसार, आज हैदराबादमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता असेल. आज हैदराबादचे तापमान 28 ते 31 डिग्रीच्या आसपास असेल. त्याशिवाय आर्द्रता 60 ते 65 टक्के राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिवसभरात हैदराबादमध्ये जोरदार पाऊस कोसळला होता. 


आज सामन्याच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता हैदराबादमध्ये पावसाची शक्यता 43 टक्के इतकी आहे. आठ वाजता 51 टक्के पाऊस कोसळू शकतो. तर 9 वाजता 51 टक्के आणि 10 वाजता 38 टक्के पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 
संध्याकाळी 11 वाजता 32 टक्के पावसाची शक्यता आहे. वेदर रिपोर्ट्स पाहिल्यास आज हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना होण्याची शक्यता कमीच दिसतेय. 






दोन्ही संघाला एक एक गुण


पावसामुळे हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. जर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर आयपीएलमधील प्लेऑफची लढत अधिक रंगतदार होणार आहे. हैदराबाद आणि लखनौ संघाने यंदाच्या हंगामात प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाच्या नावावर प्रत्येकी 12 - 12 गुण आहेत. पण हैदराबादचा रनरेट सरस असल्यामुळे ते टॉप 4 मध्ये आहेत. लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघाचे प्रत्येकी 13-13 गुण होतील. जर असं झालं तर चेन्नईच्या संघाला फटका बसणार आहे. कारण, हैदराबाद आणि लखनौ संघ टॉप 4 मध्ये एन्ट्री करतील. तर चेन्नईचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरणार आहे.