Shubman Gill  अहमदाबाद : शुभमन गिल गुजरात टायटन्सचं 2024 च्या हंगामापासून नेतृत्व करतोय. गुजरात टायटन्ससाठी यंदाचं आयपीएल समाधानकारक राहिलं आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले आहेत. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनी गुजरातला दमदार सुरुवात करुन दिली. यामध्ये शुभमन गिलला वादग्रस्त निर्णय देत धावबाद दिलं. यावरुन तो संतापल्याचं पाहायला मिळालं. बाद झाल्यानंतर शुभमन गिल ग्राऊंडबाहेर गेला तिथं उपस्थित असलेल्या पंचांसोबत त्यानं वाद घातला. 

शुभमन गिलनं 10 चौकार आणि 2 षटकार मारत 38 बॉलमध्ये 76  धावा केल्या. साई सुदर्शनच्या जोडीनं शुभमन गिलनं पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. गुजरातनं पहिली विकेट 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर गमावली. साई सुदर्शन 23  बॉलमध्ये 48 धावा करुन बाद झाला. तर, जोस बटलरनं गुजरातसाठी 37  बॉलमध्ये 64 धावा केल्या. 

शुभमन गिलला 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर तिसऱ्या पंचांनी वादग्रस्तरित्या बाद दिलं. यानंतर शुभमन गिलच्या संतापाचा भडका उडाला. तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर शुभमन गिलनं मैदान सोडलं, तो मैदानाबाहेर गेला डगआऊटच्या तिथं असलेल्या पंचांसोबत त्यानं वाद घातला. या वादाचा व्हिडिओ स्टार स्पोर्टसनं शेअर केला आहे. 

सनरायजर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो त्यांना अडचणीत आणणारा ठरला. साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गुजरातनं 6 विकेटवर 224  धावा केल्या.  शुभमन गिलनं गुजरातसाठी सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. त्यानं केकेआर विरुद्ध 90, राजस्थान विरुद्ध 84  धावा केल्या होत्या. 

शुभमन गिलनं यंदाच्या आयपीएलमध्ये 10 मॅचमध्ये 465 धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. गुजरातचा दुसरा सलामीवीर साई सुदर्शन 504  धावांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव 476 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, जोस बटलर तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर 470  धावा आहेत. 

दरम्यान, गुजरात टायटन्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गुजरातनं सनरायजर्स हैदराबादला 186 धावांवर रोखत 38 धावांनी विजय मिळवला.