चेन्नई : मुंबईकर श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्सनं  (Kolkata Knight Riders)आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hydrabad) अंतिम फेरीच्या लढतीत 8 विकेटनं पराभूत केलं. कोलकातानं सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपदाला गवसणी घातली. केकेआरच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना बलाढ्य सनरायजर्स हैदराबादला 113 धावांवर रोखलं. मिशेल स्टार्क आणि आंद्रे रसेल यांच्या दमदार गोलंदाजीच्या पुढे सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. व्यंकटेश अय्यर आणि रहमानुल्लाह गुरबाझ या दोघांनी दमदार फलंदाजी करत केकेआरचा विजय निश्चित केला.केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरची विजयानंतरची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. श्रेयस अय्यरनं आयपीएलची ट्रॉफी सर्वप्रथम यंदाच्या आयपीएलमध्ये फॉर्मबाहेर असलेल्या रिंकू सिंगच्या (Rinku Singh) हाती सोपवली. आपल्या टीममधील बॅडपॅचमधून जाणाऱ्या खेळाडूच्या हाती विजेतेपदाची ट्रॉफी देत कॅप्टन नेमका कसा असावा हे श्रेयस अय्यरनं दाखवून दिलं. 


श्रेयस अय्यरकडून ट्रॉफी रिंकू सिंगकडे, पाहा व्हिडीओ 


कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली. यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी एकत्र येत जल्लोष केला. श्रेयस अय्यरनं सर्व खेळाडूंच्या साथीनं ट्रॉफी उंचावत जल्लोष केला. श्रेयसनं यानंतर आयपीएल ट्रॉफी पहिल्यांदा रिंकू सिंगच्या हाती दिली. रिंकू सिंग सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसून तो संघर्ष करत आहेत. अशावेळी श्रेयस अय्यरची कृती सर्वांना भावणारी ठरली. 






रिंकू सिंगच्या पाठिशी श्रेयस अय्यर ठामपणे उभा 


रिंकू सिंगसाठी 2023 चं आयपीएल त्यांनतर टीम इंडियाच्या टी-20 मॅचेस चांगल्या ठरल्या होत्या. 2023 चं आयपीएल गाजवणाऱ्या रिंकू सिंगला यंदाच्या आयपीएलमध्ये फॉर्म गवसला नाही. सुनील नरेन आणि फिल सॉल्ट यांनी चांगली कामगिरी केल्यानं रिंकू सिंगला अनेकदा फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नाही. तर, ज्यावेळी रिंकूला फलंदाजीची संधी मिळाली त्यावेळी तो चांगली कामगिरी करु शकला नाही. याचा फटका रिंकू सिंगला बसला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये रिंकू सिंगचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला.  अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या 15 सदस्यीय संघात स्थान रिंकूला मिळालं नाही. 


एकीकडे आयपीएलमधील खराब फॉर्म आणि टी-20 वर्ल्डकपची संधी हुकलेली असताना  केकेआरचा संघमालक शाहरुख खान रिंकू सिंगच्या पाठिशी उभा असल्याचं दिसून आलं. तर, कॅप्टन श्रेयस अय्यरनं देखील आयपीएल ट्रॉफी रिंकूच्या हाती देत कॅप्टन कसा असावा हे दाखवून दिलं. 


संबंधित बातम्या : 


Pat Cummins : पॅट कमिन्सचे फायनलपूर्वीचे 'ते' शब्द काही तासांमध्ये खरे ठरले... हैदराबादचा कॅप्टन नेमकं काय म्हणालेला?


गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं