MCA Fitness Camp: खांद्याच्या दुखापतीतून बरा होत असलेला भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर याला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) फिटनेस शिबिरासाठी 45 सदस्यीय संघात स्थान दिले आहे. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 26 वर्षीय अय्यर जखमी झाला होता. यामुळे तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधूनही बाहेर पडला होता. अय्यर व्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई निवड समितीनेही भारतीय संघाचे नियमित सदस्य रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ यांच्या फिटनेस कॅम्पसाठी निवडले आहेत.


या फिटनेस शिबिरासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरलाही संघात ठेवण्यात आले आहे. एमसीएने एक निवेदन देताना ही माहिती दिली. तसेच, आपल्या निवेदनात ते म्हणाले, "फिटनेस शिबिराचे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केले जाईल."


अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया
इंग्लंड विरुद्ध 23 मार्च रोजी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टोचा शॉट रोखण्याचा प्रयत्न करताना 26 वर्षीय अय्यर जखमी झाला. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमधून आणि आयपीएल 2021 मधूनही त्याला वगळण्यात आले. अय्यरला खांद्याला गंभीर दुखापत झाली. स्कॅन केल्यावर असे लक्षात आले की त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर त्याच्या खांद्याचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले.


खांद्याच्या दुखापतीतून बरा होणारा अय्यर सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यात मैदानात परत येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.