चेन्नई: देशभर आयपीएलच्या 17 पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं 2024 च्या आयपीएलची सुरुवात होईल. चेन्नईनं पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी ऐवजी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्त्व दिलं आहे. ऋतुराज गायकवाडनं 2019 मध्ये चेन्नईच्या टीममध्ये पदार्पण केलं होतं. अवघ्या चार वर्षानंतर ऋतुराज गायकवाडला चेन्नईच्या नेतृत्त्वाची संधी मिळाली आहे.
चेन्नईनं 20 लाखात संघात घेतलं
ऋतुराज गायकवाडचा जन्म 31 जानेवारी 1997 ला झाला होता. ऋतुराज गायकवाडनं 2016-17 च्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्ये 2019 मध्ये ऋतुराज गायकवाडचा चेन्नई सुपर किंग्जच्या संघात समावेश आहे. ऋतुराज गायकवाडला चेन्नईच्या संघानं 2019 ला केवळ 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये संघात घेतलं होतं.
महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे ट्रॉफीत 7 मॅचमध्ये 63.42 च्या सरासरीनं 444 धावा केल्या होत्या. जून 2019 मध्ये भारत ए टीमकडून खेळतानं त्यानं श्रीलंका ए संघाविरुद्ध 186 धावा केल्या होत्या.
ऋतुराज गायकवाडची संपत्ती किती?
स्पोर्टसकीडा या वेबसाइटनुसार ऋतुराज गायकवाड कोट्यधीश आहे. आयपीएलमधूनत्याला आता कोट्यवधी रुपये मिळतात. ऋतुराज गायकवाडची अंदाजे संपत्ती 30 ते 36 कोटी रुपयांची असू शकते. बीसीसीआयनं सी कॅटेगरीमध्ये ऋतुराज गायकवाडला करारबद्ध केलं आहे. ब्रँड एंडोरसिंग आणि जाहिरातीतून देखील ऋतुराज गायकवाडला पैसे मिळतात. आयपीएल फी शिवाय ऋतुराज गायकवाडला जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमधून दरमहा 50 ते 60 लाख रुपये मिळतात अशी माहिती आहे. सध्या यातून ऋतुराज गायकवाडला दरवर्षी 8 कोटी रुपये मिळत असल्याची माहिती आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडला 6 कोटी रुपये फी मिळालेली आहे. पुण्यात ऋतुराज गायकवाडचं घर आहे. याशिवाय ऋतुराजकडे महागड्या कार देखील असल्याची माहिती आहे.
ऋतुराज गायकवाड चेन्नईला सहाव्यांदा विजेतेपद मिळवून देणार?
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे.2010, 2011, 2018, 2021 आणि2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नईनं विजेतेपद मिळवलं होतं.गेल्यावर्षी दुखापतग्रस्त असताना देखील धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं विजेतपद मिळवलं होतं. चेन्नईनं अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आता महेंद्रसिंह धोनी ऐवजी संघाच्या नेतृत्त्वाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे आली आहे.2024 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचं आव्हान ऋतुराज गायकवाड समोर असेल.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचं नेतृत्त्व येण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैनानं केलं आहे. आता ऋतुराज गायकवाडला धोनीचा वारसा पुढं चालवावा लागणार आहे.
संबंधित बातम्या:
MS Dhoni : होय हे धोनीचं शेवटचं आयपीएल..., सुनंदन लेले यांचं एबीपी माझाशी बोलताना मोठं वक्तव्य
MS Dhoni : सगळं ठरलेलं होतं? चेन्नईचं नेतृत्त्व ऋतुराजकडे, धोनीनं फेसबुक पोस्टमधून दिलेले संकेत