Ruturaj Gaikwad : आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या पूर्वसंध्येला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. आणि विशेष म्हणजे पुण्याचा मराठमोळा शिलेदार ऋतुराज गायकवाडची धोनीचा वारसदार म्हणून चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलच्या इतिहासातल्या सर्वात यशस्वी अशा दोन कर्णधारांपैकी एक हा धोनी आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत चेन्नईनं आयपीएलची तब्बल पाच विजेतीपदं पटकावली आहेत. पण तोच धोनी आज ४२ वर्षांचा आहे आणि चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्त्वात झालेला खांदेपालट लक्षात घेता, त्याचा एक खेळाडू म्हणून हा अखेरचा मोसम ठरू शकतो. वास्तविक धोनीनं २०२२ सालच्या आयपीएलआधी चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्याऐवजी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेल्या जाडेजाच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी ढासळली होती. त्यामुळं धोनीनं कर्णधारपदाची सूत्रं पुन्हा हाती घेतली होती. पण आता नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईची फ्रँचाईझी एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहत आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतर ऋतुराज गायकवाडनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यानं मोठी जाबाबदी मिळाल्याचं सांगितलं. त्याशिवाय धोनी, अजिंक्य आणि रवींद्र जाडेजा सल्ला देण्यासाठी असल्याचेही सांगितलं. सीएसकेनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


ऋतुराज गायकवाड काय म्हणाला ?


चेन्नईचा कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड यानं मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ऋतुराज गायकवाड याचा याबाबतचा व्हिडीओ सीएसकेनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ऋतुराज गायकवाड यानं कर्णधारपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. पण त्याशिवाय मोठी जबाबदारी असल्याचेही म्हटलं आहे. ऋतुराज गायकवाड म्हणाला की, कर्णधार झाल्यानंतर खूप भारी वाटतेय. पण ही एकप्रकारे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. पण संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधारपद देणं  हा माझा एकप्रकारे सन्मानाच आहे. माझ्यासोबत मार्गदर्शन करालायला माही भाई आहे. जड्डू भाई आहे, अज्जू भाई आहे. तोही एक महान कर्णधार आहे. त्यामुळे मला फार चिंता करण्याची गरज नाही. आम्ही सामना एन्ज़य करण्यावर भर देत आहोत. 




 ऋतुराज गायकवाड याला कर्णधारपद देण्याचा निर्णय एमएस धोनी आणि फ्लेम यांचा आहे. 52 सामने खेळणारा ऋतुराज गायकवाड यंदा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. तर धोनी फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. ऋतुराज गायकवाड आरसीबीविरोधात आपल्या कर्णधारपदाचा शुभारंभ करणार आहे. शुक्रवारी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये चेपॉक स्टेडियमवर सलामीचा सामना होणार आहे. 


कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडच का?


२०२१च्या आयपीएल मोसमापासून ऋतुराजकडे सीएसकेचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं.


२०२१च्या आयपीएल मोसमात ऋतुराजकडून चेन्नईसाठी सर्वाधिक ६३५ धावांचा रतीब घातला. त्या मोसमापासून ऋतुराजने चेन्नईसाठी सातत्यानं धावांचा डोंगर उभारला


आजवरच्या आयपीएल कारकीर्दीत ५२ सामन्यांमध्ये ३९.०६च्या सरासरीनं १ हजार ७९७ धावा चोपल्या आहेत. ऋतुराजचा स्ट्राईक रेट १३५.५२ एवढा जबरदस्त आहे. 


ऋतुराज गायकवाडकडून ६ वन डे आणि १९ टी-२० सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. ऋतुराजच्या नेतृत्त्वाखाली एशियाडमध्ये भारताची सुवर्णपदकाची कमाई केली.