Ruturaj Gaikwad New Orange Cap Holder In IPL 2024 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं आयपीएल 2024 मध्ये शानदार प्रदर्शन सुरु आहे. ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या हंगामात 500 धावांचा पल्ला पार केला आहे. त्यानं विराट कोहलीकडून ऑरेंज कॅप हिसकावली आहे. याआधी ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या नावावर होती. पण आज पंजाबविरोधात ऋतुराजनं 62 धावांची शानदार खेळी करत ऑरेंज कॅप हिसकावली आहे. त्याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कर्णदारानं 500 धावांचा पल्ला पार केल्याचा इतिहासही रचला आहे. ऋतुराज गायकवाड याच्या 62 धावांच्या शानदार खेळीच्या बळावर चेन्नईला 162 धावांपर्यंत मजल मारता आली. 


विराटकडून हिसकावली ऑरेंज कॅप - 


मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं विराट कोहलीकडून ऑरेंज कॅप हिसकावली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नावावर 509 धावा जमा झाल्या आहेत. विराट कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विराट कोहलीनं 10 सामन्यात 72 च्या सरासरीने 500 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या साई सुदर्शन यानं दहा सामन्यात 418 धावा केल्या आहेत. तर केएल राहुल आणि ऋषभ पंत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. केएल राहुल यानं 10 सामन्यात 406 तर पंतने 11 सामन्यात 398 धावा केल्या आहेत. फिलिप सॉल्ट सहाव्या क्रमांकावर आहे, त्यानं 392 तर सातव्या क्रमांकावर असणाऱ्या संजूने 385 धावा केल्या आहेत. 






यंदाच्या हंगामातील ऋतुराजची कामगिरी कशी राहिली ? 


आयपीएल 2024 मध्ये चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली. ऋतुराज गायकवाडनं कर्णधारपद संभाळल्यानंतर शानदार फलंदाजी सुरुच ठेवली. ऋतुराजने दहा सामन्यात 509 धावांचा पाऊस पाडला. त्याची सरासरी 64 इतकी राहिली तर स्ट्राईक रेट 147 इतका आहे. ऋतुराज गायकवाडने एक शतक चार अर्धशतके ठोकली आहे. यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाड यानं आतापर्यंत 53 चौकार आणि 15 षटकार ठोकले आहेत. 






पंजाबविरोधात ऋतुराजची शानदार फलंदाजी


एकीकडे विकेट पडत असताना ऋतुराज गायकवाडनं दुसऱ्या बाजूने शानदार फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर चेन्नईने 162 धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाडने 48 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. ऋतुराज गायकवाडचा अपवाद वगळता चेन्नईच्या एकाही फलंदाजाला तीस धावसंख्याही पार करता आली नाही.