जयपूर : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने आले आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवल्यानं लखनौचा आत्मविश्वास वाढला आहे. आज बंगळुरुनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौला प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलं. लखनौच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. मात्र, पहिल्या विकेटनंतर रिषभ पंत आणि मिशेल मार्श यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. मिशेल मार्श अर्धशतक करुन बाद झाला तर रिषभ पंतनं नाबाद शतक केलं. 

रिषभ पंतचं अनोखं सेलिब्रेशन 

रिषभ पंतला मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंटसनं 27 कोटी रुपयांना घेतलं होतं. त्यानंतर रिषभ पंतला लखनौ सुपर जायंटसचं कॅप्टन करण्यात आलं. मात्र, लखनौला संघमालक संजीव गोयंका यांच्या अपेक्षेप्रमाणं दमदार कामगिरी करता आली नाही. लखनौ यंदा देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला. अखेरच्या साखळी सामन्यात मात्र, लखनौचा कॅप्टन रिषभ पंत यानं दमदार शतक झळकावलं. रिषभ पंतनं 61 बॉलमध्ये नाबाद 118 धावा केल्या. या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 8 षटकार मारले. रिषभ पंतनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकावल्यानंतर अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. रिषभच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. 

रिषभ पंतचं सेलिब्रेशन पाहा व्हिडिओ

लखनौचा धावांचा डोंगर

लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा केल्या. रिषभ पंतच्या नाबाद 118 धावा आणि मिशेल मार्शच्या 67 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला. ब्रीटझके यानं 14, निकोलस पूरन यानं 13 धावा केल्या. लखनौ सुपर जायंटसचा आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून विजयानं समारोप करायचा प्रयत्न राहील. लखनौ सुपर जायंटसला विजय मिळवायचा असल्यास बंगळुरुच्या बलाढ्य फलंदाजीला रोखावं लागेल. 

आजच्या सामन्यानंतर प्लेऑफचं गणित ठरणार

प्लेऑफमध्ये कोण क्वालिफायर 1 आणि कोण एलिमिनेटर संघ खेळणार हे पूर्णपणे निश्चित झालेलं नाही. पंजाब किंग्ज क्वालिफायर 1 खेळेल तर मुंबई इंडियन्स एलिमिनेटरचा सामना खेळणार आहे. त्यांच्या विरोधात कोण कोण खेळणार हे स्पष्ट झालेलं नाही. आजच्या सामन्यात जर आरसीबीनं विजय मिळवला तर ते क्वालिफायर 1 चा सामना खेळतील. तर, पराभूत झाले तर त्यांना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल.