Rishabh Pant Fined, DC vs CSK : ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (DC vs CSK) पराभव केला. रविवारी विशाखापटनम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant ) यानं शानदार अर्धशतक ठोकलं. त्याशिवाय चपळ नेतृत्व करत त्यानं दिल्लीला विजय मिळवून दिला. पण विजयानंतरही ऋषभ पंत याला मोठा झटका (Rishabh Pant Fined) बसला आहे. चेन्नईविरोधात स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंत याला आर्थिक दंड बसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये असा दंड बसणारा पंत दुसरा कर्णधार आहे. याआधी गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यालाही आर्थिक दंडाचा फटका बसला आहे.
चेन्नईविरोधात स्लो ओव्हर रेटमुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याला आर्थिक दंड करण्यात आला आहे. रविवारी विशाखापटनम येथे झालेल्या सामन्यात चेन्नईविरोधात ठरलेल्या वेळामध्ये षटकं न संपवल्यामुळे पंतनं आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं समोर आले. त्यामुळे ऋषभ पंत याला 12 लाख रुपयांचा दंड केला. यंदाच्या आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे आर्थिक दंड बसल्याचा पंत पहिला कर्णधार नाही. याआधी गुरजरातचा कर्णधार शुभमन गिल यालाही 12 लाख रुपयांचा दंड बसला होता. 26 मार्च रोजी चेन्नईविरोधात एम चिदंबरम स्टेडियम झालेल्या सामन्यात शुभमन गिल याला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड ठोठावला होता.
ऋषभ पंतची शानदार खेळी, धोनीची फटकेबाजी -
ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने निर्धारित 20 षटकांमध्ये पाच विकेटच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीसाठी डेविड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांनी वादळी अर्धशतकं ठोकली. डेविड वॉर्नरने 52 धावांची खेळी केली. तर ऋषभ पंत यानं 32 चेंडूमध्ये 160 च्या स्ट्राईक रेटने 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पंतने चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. पंत जुन्या फॉर्मात परतल्याचं दिसले.
दिल्लीने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. ऋतुराज आणि रचिन रवींद्र झटपट माघारी परतले. त्यानंतर अजिंक्य रहाणे यानं डाव सावरला. पण पुन्हा एकदा चेन्नईची फलंदाजी ढेपाळली. अखेरीस माजी कर्णधार एमएस धोनी यानं वादळी फटकेबाजी केली. धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत 16 चेंडूमध्ये नाबाद 37 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. धोनीच्या फलंदाजीनं चाहत्यांना प्रभावित केले.