अहमदाबाद :आयपीएलच्या 18 व्या हंगामातील अखेरचा सामना म्हणजेच अंतिम लढत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या लढतीच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर या दोघांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदार यानं त्यांची टीम आयपीएलच्या चौथ्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. आम्ही पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकू असं रजत पाटीदार म्हणाले.
बंगळुरुचा मधल्या फळीतील फलंदाज टीम डेविड फायनलमध्ये खेळेल की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय वैद्यकीय टीमकडून घेतला जाईल. डॉक्टर्स तिथं आहेत. आम्हाला यासंदर्भातील माहिती उद्या मिळेल. त्यासंदर्भातील अधिक माहिती देणं योग्य नाही, असं रजत पाटीदार म्हणाला.
रजत पाटीदार म्हणाला की नव्या खेळाडूंसोबत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू आत्मविश्वासपूर्ण वातावरण तयार करणं यासाठी माझा प्रयत्न असतो. आम्ही प्रयत्न करु आणि विराट कोहलीसाठी जिंकू असं रजत पाटीदार म्हणाला. टीम इंडिया आणि आरसीबीसाठी त्यानं अनेक वर्ष खूप योगदान दिलं आहे, असं रजत पाटीदार म्हणाला.
जेव्हा तुम्ही आरसीबीसारख्या संघाचं नेतृत्त्व फायनलमध्ये करत असता तेव्हा तुमच्याकडून नैसर्गिकपणे अपेक्षा केल्या जातात. मात्र, माझा नेहमी फोकस हा जे माझ्या नियंत्रणात असेल त्यावर आणि वर्तमानावर असतो, असं रजत पाटीदार म्हणाला. कर्णधारपदाचा प्रवास खूप गोष्टी शिकवणारा अनुभव ठरला असं, रजत पाटीदार म्हणाला. तुमच्या आजूबाजूला चांगले लीडर्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील विदेशी खेळाडूंनी दृष्टिकोनाला आकार दिला, असं रजत पाटीदार म्हणाला.
रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आमने सामने आले होते. आता पुन्हा एकदा दोघं आमने सामने आले आहेत. श्रेयसचा फायनलमध्ये पुन्हा एकदा सामना करणं हा चांगला योगायोग असून आव्हान नवं आहे, आम्ही त्यासाठी सज्ज आहे, असं रजत पाटीदारनं म्हटलं.
पंजाब किंग्ज यापूर्वी 2014 मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलं होतं. त्यावेळी त्यांना केकेआरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, आरसीबीनं तीनवेळा आयपीएल फायनल खेळली आहे. 2009,2011 आणि 2016 मध्ये आरसीबीनं फायनल खेळली मात्र त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जला पराभूत केलं होतं. तर, पंजाब किंग्जनं क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली.