Rachin Ravindra, IPL 2024 : भारतामध्ये झालेला विश्वचषक (World Cup 2024) गाजवणाऱ्या रचिन रवींद्रने आयपीएलमध्येही (IPL 2024) शानदार सुरुवात केली. रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आयपीएलमध्ये (IPL 2024) चेन्नईचा सदस्य आहे. त्यानं पहिल्या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. चेपॉकवरील दोन्ही सामन्यात रचिन रविंद्र यानं 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये रचिन रवींद्र यानं गुजरातच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रवींद्र याला वृद्धीमान साहा यानं यष्टीचीत केले. राशिदच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याचं अर्धशतक फक्त चार धावांनी हुकलं. त्यानं आक्रमक सुरुवात करत गुजरातची गोलंदाजी फोडली.
रचिन रवींद्रची विस्फोटक फलंदाजी -
डेवॉन कॉन्वे दुखापतग्रस्त झाल्यामुळे रचिन रवींद्र हा चेन्नईकडून यंदाच्या हंगामात सलामीला उतरला. संघाने दाखवलेला विश्वास रवींद्रने सार्थ ठरवला. पॉवरप्लेमध्ये रचिन रवींद्र यानं 230 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. रचिन रवींद्र याने अवघ्या 20 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये रवींद्रने तीन षटकार आणि सहा चौकारांचा साज घातला. रचिन रविंद्र यानं अनुभवी उमेश यादव याची गोलंदाजी फोडून काढली. त्यानं उमेश यादवच्या षटकात दोन षटकार मारले. उमेश यादवला 2 षटकात तब्बल 27 धावा काढल्या.
आक्रमक सुरुवात -
रचिन रविंद्र यानं कर्णधार ऋतुराज गायकवाड याला साथीला घेत चेन्नईला वेगवान सुरुवात दिली. दोन्ही सामन्यात त्यानं प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फोडून काढली. रचिन रवींद्र एकीकडे आक्रमक खेळत असताना ऋतुराज गायकवाड संयमी फलंदाजी करत होता. सलामीसाठी दोघांनी 32 चेंडूमद्ये 62 धावांची भागिदारी केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडचं योगदान फक्त 12 धावांचं आहे. तर रचिन रवींद्र यानं 20 चेंडूमध्ये 46 धावा केल्या.
दोन सामन्यात केले प्रभावित -
आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यात रचिन रवींद्र यानं सर्वांनाच प्रभावित केलेय. रवींद्रने दोन सामन्यात 41.50 च्या सरासरीने 83 धावा चोपल्या आहेत. त्यानं 238 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई केली. दोन डावा रवींद्रने 9 चौकार आणि सहा षटकार चोपले आहेत. आयपीएलची सुरुवात शानदार झाली आहे.
1.8 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात -
आयपीएल 2024 आधी झालेल्या मिनी लिलावात चेन्नईने रचिन रवींद्र Rachin Ravindra याच्यावर डाव खेळला. रचिन रवींद्र याला चेन्नईने 1.8 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. चेन्नईने दाखवलेला विश्वास रचिन रवींद्र याने सार्थ ठरवला. त्याने दोन्ही सामन्यात शानदार सुरुवात करुन दिली.