Rohit Sharma, MI vs PBKS : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किग्स यांच्यादरम्यान आयपीएलच्या 15 व्या हंगमातील 23 वा सामना होणार आहे. या सामन्यात पंजाबचा संघ वरचढ आणि ताकदवर दिसत आहे. यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या चारही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पहिल्या चार सामन्यात पंजाबने दोन विजय मिळवले आहेत, तर दोन सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे, तर पंजाबचा संघ तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर मोठा विक्रम होऊ शकतो. 


रोहित शर्माला टी 20 सामन्यात दहा हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी रोहित शर्माला 25 धावांची गरज आहे. पंजाबविरोधात रोहित शर्माने 25 धावा केल्यास तो हा कारनामा करणार आहे. रोहित शर्माने दहा हजार धावांचा पल्ला पार केल्यास असा पराक्रम करणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू होणार आहे. याआधी टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. 


जागतिक क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी 20 क्रिकेटमध्ये 14562 धावा केल्या आहेत. गेलने 463 सामन्यात हा कारनामा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शोएब मलिक आहे. मलिकने 11 हजार 698 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 330 सामन्यात 10379 धावा चोपल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि 76 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक धावा असणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा सध्या सातव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत  374 सामन्यात 9975 धावा चोपल्या आहेत. पंजाबविरोधात होणाऱ्या सामन्यात 25 धावा करताच रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणार आहे.   


कधी आहे सामना?
आज 13 एप्रिल रोजी होणारा हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.


कुठे आहे सामना?
हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.