Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. जेव्हा ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला तेव्हा सीएसके चाहते नाराज झाले, पण त्याच वेळी अशी आशा होती की, एमएस धोनी कर्णधार होताच तो चेन्नई सुपर किंग्जची बुडती बोट वाचवेल. पण आयपीएलमध्ये चेन्नई संघाला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे.
कर्णधार बदलला, पण संघाच्या नशिबात कोणताही बदल झालेला नाही. आता चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ अशक्य झाले आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामना सुरू होताच चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी केकेआरसमोर शरणागती पत्करली.
'चेन्नई एक्सप्रेस' बनली मालगाडी
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 103 धावा करता आल्या. एके क्षणी असे वाटत होते की सीएसकेचा डाव 100 धावांचा टप्पाही ओलांडणार नाही, पण शिवम दुबेने शेवटच्या षटकात दोन चौकार मारून संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेचा हा तिसरा सर्वात कमी स्कोअर आहे, तर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील हा त्यांचा सर्वात कमी स्कोअर आहे.
केकेआरच्या फिरकीपटूंसमोर सीएसकेच्या फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली. परिस्थिती अशी होती की अर्धा संघ फक्त 70 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टेडियममध्ये पोहोचलेल्या चाहत्यांना आशा होती की एमएस धोनी बॅटने काही जादू दाखवेल, परंतु तोही सुनील नरेनच्या फिरकीत अडकला आणि चेपॉक स्टेडियममध्ये शांतता पसरली.
सीएसकेच्या नावावर लज्जास्पद विक्रम
यासोबतच, सीएसकेच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जोडला गेला. आजच्या आधी, आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात चेन्नईने कधीही सलग 5 सामने हरली नव्हती. चेन्नईला सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या हंगामात चेन्नईचा त्यांच्या घरच्या मैदानावरचा हा तिसरा पराभव होता. चेन्नई संघाने घरच्या मैदानावर सलग तीन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हंगामात, सीएसकेला आरसीबी, दिल्ली आणि आता चेपॉक येथे कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला आहे.
रहाणेने पण 'थाला'ला मैदानात घेरलं अन्...
जेव्हा एमएस धोनी फलंदाजीसाठी आला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जची स्थिती 14.2 षटकांत 7 बाद 72 अशी होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने धोनीवर दबाव आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने स्लिप आणि शॉर्ट लेगवर फिल्डर ठेवला आणि असे वाटले की चेन्नईमध्ये टी-20 नाही तर कसोटी सामना खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधाराने एमएस धोनीला पाहून कसोटी सामन्याचे क्षेत्ररक्षण करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. जेव्हा गौतम गंभीर केकेआरचा कर्णधार होता, तेव्हा त्याने धोनीलाही मैदानावर घेरले होते. चाहते दोन्ही सामन्यांचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर माही आणि सीएसकेला प्रचंड ट्रोल करत आहेत.