Mumbai Indians IPL 2025 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी या हंगामात निराशाजनक राहिली आहे. संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामने गमावले आहेत. हा संघ पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. आता मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना रविवार 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. मैदानावर या हंगामातील हा पहिला सामना असणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू मैदान सोडून पळताना दिसत आहे.
शुक्रवारी दिल्लीचे हवामान अचानक बदलले, शहरात धुळीचे वादळ सुरू झाले. यावेळी मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सराव करत होते. जोरदार वादळामुळे स्टेडियममधील होर्डिंग पडण्याचा धोका होता, त्यादरम्यान सर्व खेळाडू पळत मैदानातून थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले.
अरुण जेटली स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंमाचा पहिला सामना 13 एप्रिल रोजी खेळला जाईल. या सामन्यासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स शुक्रवारी सरावासाठी स्टेडियममध्ये पोहोचले, परंतु काही वेळातच हवामानाचा मूड पूर्णपणे बदलला. खेळाडूंच्या सरावावरही परिणाम झाला, खेळाडूंना सराव अर्ध्यावर सोडून मैदानाबाहेर पळावे लागले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, ट्रेंट बोल्ट ओरडत आणि जोरात पळत मैदानाबाहेर जात आहे.
डीसी विरुद्ध एमआय सामन्यादरम्यान दिल्लीत हवामान कसे असेल?
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रविवार 13 एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुक्रवारी धुळीचे वादळ होते, शनिवारीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली हवामान अहवालानुसार, रविवारी पावसाची शक्यता कमी आहे, पण वारे जोरदार असणार आहे. रविवारी सामन्यादरम्यान दिल्लीतील तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्धचा शेवटचा सामना 6 विकेट्सने जिंकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्ली हा एकमेव संघ आहे ज्याने एकही सामना गमावलेला नाही. 4 सामन्यांत 4 विजयांसह, दिल्ली कॅपिटल्स सध्या 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा -
