Ms Dhoni Dismissed for the First Time in Ipl 2024 : आयपीएल 2024 मध्ये धोनी पहिल्यांदाच बाद झालाय. दहाव्या डावात धोनीला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश आलेय. धोनीला आतापर्यंत कोणताही गोलंदाज बाद करु शकला नाही. पंजाबविरोधात धोनी धावबाद झाला. चेपॉक स्टेडियमवर चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंत मजल मारली. यंदाच्या हंगामात धोनीनं अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला, पण पंजाबविरोधात धोनीची बॅट शांत राहिली. फिरकी गोलंदाज राहुल चाहर यानं धोनीला धावा काढून दिल्या नाहीत. धोनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच बाद झाला, त्याला गोलंदाजाने बाद केले नाही तर तो धावबाद झालाय. अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धोनी धावबाद झाला.
पंजाबविरोधात धोनीनं किती धावा केल्या -
ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर धोनी 18 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मैदानात उतरला. पण धोनीला मोठे फटके मारता आले नाहीत. 19 वे षटक फेकणाऱ्या राहुल चाहर यानं धोनीला निर्धाव चेंडू टाकले. धोनीनं पंजाबविरोधात 11 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी केली. यामध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. धोनीला राहुल चाहर याला एकही षटकार ठोकता आला नाही.
यंदाच्या हंगामातील धोनीची कामगिरी -
यंदाच्या हंगामात धोनी पहिल्या नऊ सामन्यात नाबाद राहिला. त्यानं तळाला जाऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. धोनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच बाद झाला. धोनीनं यंदाच्या हंगामात 10 सामन्यात 110 धावा केल्या आहेत. धोनीचा स्ट्राईक रेट 229 इतका राहिलाय. तर धोनीने दहा चौकार आणि नऊ षटकार ठोकले आहेत. धोनीनं 110 च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक सरासरी धोनीची राहिली आहे.
धोनीनं यंदाच्या हंगामात वादळी फलंदाजी केली. धोनीनं मुंबईविरोधात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर चार चेंडूमध्ये 20 धावांचा पाऊस पाडला होता. याच फरकानं चेन्नईचा विजय झाला. त्याशिवाय पहिल्याच सामन्यात आरसीबीविरोधात नाबाद 37 धावा चोपल्या होत्या. धोनीनं यंदाच्या हंगामात तळाला निर्णायक धावांचा पाऊस पाडलाय.धोनी अखेरच्या दोन षटकात येऊन फटकेबाजी करण्याच काम चोख बजावत आहे.