MS Dhoni And Pathirana Video: चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 26 मार्च रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्सने 63 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बेवी मलिंगा म्हणून ओळखला जाणारा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानाचा आहे.  


सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मथिशा पथिराना धोनीच्या पाया पडल्याचा दावा करण्यात येत आहे. एका चूकीच्या दिशेने असलेल्या व्हिडिओद्वारे पथिरानाने धोनीच्या पायला स्पर्श केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. मात्र दुसऱ्या व्हिडिओच्या अँगलने अखेर सत्य समोर आले आहे. पथिराना धोनीच्या पायाला स्पर्श करत नसून गोलंदाजी टाकताना लागणारे मार्कर उचलताना दिसत आहे. जे धोनीच्या अगदी पायाच्या जवळ होते.






पाहा खरा व्हिडिओ-






चेन्नईचा गुजरातविरुद्ध विजय-


गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली.  चेन्नईने  हा सामना एकतर्फी जिंकला. प्रथम खेळताना रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 6 बाद 206 धावा केल्या. शिवम दुबेने केवळ 23 चेंडूत 51 धावांची खेळी केली. सलामीवीर रचिन रवींद्रने 20 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. चेन्नईच्या फलंदाजांनी उघडपणे फलंदाजी केली आणि गुजरातच्या गोलंदाजांनी संघर्ष सुरूच ठेवला. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ 143 धावा करू शकला. साई सुदर्शनने सर्वाधिक 37 धावा केल्या मात्र तो मुक्तपणे खेळू शकला नाही. त्याने 31 चेंडूत केवळ 3 चौकारांचा सामना केला. पाथीरानाने 4 षटकांत 29 धावांत एक विकेट घेतली. तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. चेन्नईने हा सामना 63 धावांनी जिंकला. गुजरात टायटन्सचा हा आयपीएलच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव ठरला.


CSK ची IPL 2024 मधील कामगिरी


चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामने जिंकून या संघाने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाचा मुकुट कायम ठेवला आहे. CSK चा पहिला सामना 22 मार्च रोजी RCB विरुद्ध होता. सीएसकेने हा सामना सहा गडी राखून जिंकला. दुसरा सामना 26 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होता. सीएसकेने हा सामना 63 धावांनी जिंकला.


चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना


चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना 31 मार्चला आहे. CSK हा सामना विशाखापट्टणमच्या क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळणार आहे. यानंतर CSK चा चौथा सामना 5 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.