Mohammed Shami Ipl 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाचं गुरुवारी अनावरण झालं. पहिल्या टप्प्यात 21 सामने पार पडणार आहेत. उप विजेत्या गुजरातचा पहिला सामना 24 मार्च रोजी मुंबईविरोधात रंगणार आहे. वेळापत्रक समोर येताच गुजरातसाठी धक्कादाक बातमी आली. स्टार गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. हा गुजरातसाठी मोठा धक्का मानला जातोय. गुजरातनं 2022 मध्ये आयपीएल पदार्पण केले, त्याचवर्षी त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर गेल्यावर्षी गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं. या दोन हंगमात मोहम्मद शामी यानं गुजरातकडून भेदक मारा करत विजयात मोलाचा वाटा उचललाय. पण आता दुखापतीमुळे मोहम्मद शामी आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. मोहम्मद शामीच्या घोठ्यावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, याबाबत गुरुवारी बीसीसीआयनं माहिती दिली. 


वनडे विश्वचषकानंतर मोहम्मद शामी दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. दुखापत असतानाही मोहम्मद शामी यानं भारतासाठी विश्वचषक गाजवला होता. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेलाही तो मुकलाय. मोहम्मद शामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.


बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शामी घोट्याच्या दुखण्यावर इंजेक्शन घेण्यासाठी जानेवारी अखेरीस इंग्लंडला गेला होता. तीन आठवड्यानंतर तो हलकं फुलकं धावायला सुरुवात करु शकतो, असं सांगण्यात आलं. पण इंजेक्शनचा त्याला फायदा झाला नाही. त्यामुळे आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोहम्मद शामीच्या आयपीएल खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. 














गुजरातचा पहिला सामना मुंबईविरोधात -


आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामान 24 मार्चला अहमदाबादमध्ये होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी संध्याकाळी हा सामना खेळवला जाईल. तर पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलला लखनऊ विरुद्ध गुजरात हे दोन्ही संघ भिडणार आहेत.  दरम्यान, आयपीएलचं दुसऱ्या सत्राचं शेड्युल कधी जाहीर होणार याबाबतही उत्सुकता आहे.