नवी दिल्ली: आयपीएल (IPL 2024) संपल्यानंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी  (T 20 World Cup) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होईल. भारताची वर्ल्ड कपमधील पहिली मॅच आयरलँडसोबत होईल. भारतानं 2007 च्या पहिल्या टी- 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये देखील भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. वर्ल्ड कपला आता 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं त्याच्या मनातील टीम इंडिया निवडली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये टी-20 मधील भारताचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग, संजू सॅमसन यांना संधी देण्यात आलेली नाही. 


मोहम्मद कैफनं कुणावर विश्वास ठेवला?


मोहम्मद कैफनं आयपीएलमध्ये आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालवर विश्वास ठेवला आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करतील, असं त्यानं म्हटलं. याशिवाय रिषभ पंतला त्यानं विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून संधी दिली आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या असा भारताच्या बॅटिंगचा क्रम असू शकतो. त्यानंतर सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल आणि 8 व्या क्रमांकावर रवींद्र जडेजाला बॅटिंगला पाठवावं, असं कैफ म्हणाला. धक्कादायक बाब म्हणजे टी-20 मधील भारताचा युवा खेळाडू रिंकू सिंग, शुभमन गिल आणि संजू सॅमसनला मोहम्मद कैफनं संघात स्थान दिलेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतक झळकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या रियान परागला कैफनं प्राधान्य दिलं आहे. 


मोहम्म्द कैफनं पुढं स्पिनर कुलदीप यादवला देखील संघात स्थान दिलं आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह हे भारताचे वेगवान गोलंदाज असतील. याशिवाय युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजला देखील संधी दिली जावी, असं कैफनं म्हटलंय.  


कैफनं निवडलेल्या ड्रीम टीममध्ये कुणाला संधी?


यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, शिवम दुबे, रियान पराग आणि मोहम्मद सिराज


भारत टी-20 वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरणार?


भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता. भारतानं पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत विजय मिळवला होता. मात्र, 2007 नंतर भारताला पुन्हा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरता आलेलं नाही.  भारत यंदा तरी दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरणार का ते पाहावं लागणार आहे. 


संबंधित बातम्या : 


RR vs PBKS : गुजरात विरुद्ध शेवटच्या बॉलवर पराभव, संजू सॅमसनचा टॉस जिंकून मोठा निर्णय, पंजाब किंग्ज विरुद्ध नवा प्लॅन


Rohit Sharma : ना दिल्ली, ना लखनौ आता चेन्नईची चर्चा, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? नवा दावा नेमका कुणी केला?