LSG vs MI IPL 2023 Eliminator : आकाश मधवालच्या भेदक माऱ्यापुढे लखनौच्या संघाची दाणादाण उडाली.  मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारद झाला.  लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या विजयासह मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. 26 मे 2023 रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. गुजरात आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ 28 मे रोजी चेन्नईसोबत भिडणार आहे.  




लखनौच्या फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतर हराकिरी केली. लखनौने 8.2 षटकात दोन बाद 69 धावा केल्या होत्या. पण तेथूनच मुंबईने सामन्यावर पकड मिळवली... लखनौच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 2 बाद 69 वरुन लखनौचा डाव 101 धावांत संपुष्टात आला. आकाश मधवाल याच्या भेदक माऱ्यापुढे लखनौच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 


लखनौकडून मार्कक्स स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. स्टॉयनिस याने 27 चेंडूत 40 धावाची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. स्टॉयनिसचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 20 धावसंख्या ओलांडता आली नाही. कायल मायर्स 18, प्रेरक मांकड 3, कृणाल पांड्या 8, आयुष बडोनी 1, निकोलस पूरन 0, दीपक हुड्डा 15, कृष्णप्पा गौतम 2, रवि बिश्नोई 3 आणि मोसिन खान 0 धावांवर तंबूत परतले. यंदाच्या हंगामात दीपक हुड्डा याने लखनौच्या संघाला निराश केले. हुड्डा याला एकाही सामन्यात लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. 






आकाशचा पंच - 


युवा आकाश मधवाल याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. आकाश मधवाल याने लखनौचा अर्धा संघ तंबूत धाडला. मधवाल याने 3.3 षटकात पाच धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या.  जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत युवा आकाश मधवाल याने गोलंदाजीची धुरा सांभाळली. ख्रिस जॉर्डन आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  कृष्णप्पा गौतम, मार्कस स्टॉयनिस आणि दीपक हुड्डा धावबाद झाले.