LSG vs MI IPL 2023 Eliminator: नवीन उल हक आणि यश ठाकूर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 182 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. त्याशिवाय सूर्यकुमार यादव यानेही 33 धावांचे योगदान दिले. नवीन उल हक आणि यश ठाकूर या जोडीने मुंबईच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. लखनौला विजयासाठी 183 धावांची गरज आहे.


मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेपॉकच्या मैदानावर लखनौचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. इशान किशन आणि रोहित शर्मा यांची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. रोहित शर्मा अवघ्या 11 धावांवर बाद झाला. तर इशान किशन 15 धावांवर तंबूत परतला. रोहित शर्माने एक चौकार आणि एक षटकार लगावला. तर इशान किशन याने तीन चौकार लगावले. दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 


सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी मुंबईची धावसंख्या झटपट वाढवली. दोघांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण नवीन उल हक याने ही जोडी फोडली. सूर्यकुमार यादव याला 33 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर कॅमरुन ग्रीन यालाही त्याच षटकात बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. कॅमरुन ग्रीन याने 23 चेंडूत 41 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 20 चेंडूत 33 धावांची खेळी केली. यामध्ये सूर्याने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर कॅमरुन ग्रीन याने सहा चौकार आणि एक षटकार ठोकला. 


दोन विकेट झटपट गेल्यानंतर तिलक वर्मा याने टिम डेविडच्या मदतीने मुंबईची धावसंख्या हालती ठेवली. पण यश ठाकूर याने डेविडला तंबूचा रस्ता धाकवला. डेविड फक्त 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक र्माही बाद झाला. तिलक वर्माने दोन षटकाराच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले. अखेरीस नेहाल वढेरा इम्पॅक्ट पाडत मुंबईला सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचवले. नेहल वढेरा याने 12 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने 23 धावांची खेळी केली. 


नवीन उल हकचा भेदक मारा - 


नवीन उल हक याने भेदक मारा केला. नवीन याने अचूक टप्प्यावर मारा करत मुंबईच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नवीन याने चार षटकात 38 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि कॅमरुन ग्रीन या मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांना नवीन उल हक याने बाद केले.  यश ठाकूर यानेही भेदक मारा करत मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. मोसीन खान याला एक विकेट मिळाली. कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम आणि रवि बिश्नोई यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.