LSG Team Owner Sanjeev Goenka लखनौ : आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये तीन संघांनी प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्स,पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. लखनौ सुपर जायंटसचे संघ मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांचा व्हिडिओ गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. ते केएल राहुलसोबत आक्रमकपणे संवाद करत असल्याचं त्यात व्हिडिओत पाहायला मिळत होतं. त्या प्रकरणानंतर लखनौनं राहुलला संघातून रिलीज केलं आणि रिषभ पंतला 27 कोटी रुपये मोजून संघात घेतलं. मात्र, केएल राहुलची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेतली असता गोयंकांना 27 कोटींची डील महागात पडल्याचं दिसून येतं.  

Continues below advertisement


संजीव गोयंकांना 27 कोटींची डील महागात?


मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंटसनं रिषभ पंतला 27 कोटी रुपयांची डील करत खरेदी केलं होतं. याशिवाय त्याला लखनौचं कॅप्टनदेखील करण्यात आलं. केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सनं 14 कोटी रुपयांना खरेदी केलं. आयपीएल सॅलरीच्या संदर्भात विचार केला असता पंत राहुल पेक्षा पुढं आहे. मात्र, आयपीएल 2025 मधील कामगिरीचा विचार केला असता केएल राहुल आघाडीवर आहे. केएल राहुलच्या फलंदाजीची आकडेवारी दाखवून देते की लखनौचा त्याला रिलीज करण्याचा निर्णय चुकीचा होता.  


रिषभ पंतनं 11 मॅचमध्ये केवळ 128 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 12.80 इतकी आहे. रिषभ पंतनं  या हंगामात केवळ एक अर्धशतक झळकावलं आहे. दुसीरकडे केएल राहुल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. राहुलनं आतापर्यंत 11 मॅचमध्ये 61.63 च्या सरासरीनं 493 धावा केल्या आहेत. केएल राहुलनं एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 112 इतकी आहे. 


लखनौ आणि दिल्लीची कामगिरी कशी?


आतापर्यंत तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमध्ये आता केवळ एका संघाला स्थान मिळेल. चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंटस यांच्यात स्पर्धा आहे. दिल्लीचा विचार केला तर राहिलेल्या दोन मॅच जिंकून त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो. मुंबईला देखील राहिलेल्या दोन मॅच जिंकाव्या लागतील. याशिवाय लखनौचा विचार केला तर त्यांना तीन सामने जिंकावे लागतील. त्यामध्ये नेट रनरेट चांगलं असणं आवश्यक आहे. इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश ठरेल.