IPL 2024: KKR vs SRH: हेन्रींक क्लासेन याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी सनरायजर्स केल्यानंतरही हैदराबादला आयपीएल-17 मध्ये शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून अवघ्या चार धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.


कोलकाताने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाचे सलामीवीर मयंक अग्रवाल (32 धावा) व अभिषेक शर्मा (32 धावा) यांनी संघासाठी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र मयंक आणि अभिषेक बाद झाल्यानंतर हैदराबादने ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या. हैदराबादची 5 विकेट्स वर 145 धावा असताना हेन्रींक क्लासेनने 29 चेंडूत 63 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 षटकार लगावून हैदराबादला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षित राणाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. कोलकाताकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या सुयश शर्माने अप्रितिम झेल घेत क्लासेनला माघारी पाठवले आणि कोलकाताचा विजय निश्चित झाला. 






अन् क्षणांत सामना बदलला-


15 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या चार विकेट्सच्या मोबदल्यात 128 धावा होती. त्यानंतर क्लासेन 18 धावा करून क्रीजवर तर अब्दुल समद दोन धावा करून खेळत होते. 17व्या षटकात चौकारांमुळे समदने आपली विकेट गमावली. त्याला 15 धावा करता आल्या. 17 षटकांनंतर धावसंख्या पाच विकेटवर 149 धावा होती. त्यानंतर शाहबाज अहमद फलंदाजीला आला. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 60 धावांची गरज होती. क्लासेन-शहबाजने 18व्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत या षटकात 21 धावा केल्या. हे षटक वरुण चक्रवर्तीने टाकले. यानंतर 19व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला आणि त्याच्या षटकात क्लासेन-शहबाजने 26 धावा केल्या. क्लासेननेही आपले अर्धशतक 25 चेंडूत पूर्ण केले. शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती आणि 22 वर्षीय हर्षित राणा गोलंदाजीसाठी आला.


शेवटच्या षटकाचा थरार-


19.1- 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्लासेनने षटकार ठोकला.
19.2- दुसऱ्या चेंडूवर क्लासेनने धाव घेतली.
19.3- तिसऱ्या चेंडूवर हर्षितने शाहबाजला (१६) श्रेयस अय्यरकडे झेलबाद केले.
19.4- नवीन फलंदाज यानसेनने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली.
19.5- पाचव्या चेंडूवर हर्षितने क्लासेनला सुयशकरवी झेलबाद केले. क्लासेनने 29 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.
19.6- शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती आणि कमिन्स स्ट्राइकवर होता. मात्र, स्लोअर वनवर कमिन्सचा फटका चुकला आणि कोलकाताने चार धावांनी विजय मिळवला.


https://www.iplt20.com/video/51712/thrilling-finish-harshit-rana-holds-his-nerve-to-defend-13-off-the-last-over?tagNames=2024


संबंधित बातम्या:


IPL 2024: अहमदाबादमध्ये क्वालिफायर अन् एलिमिनेटरचा सामना; IPLच्या  महाअंतिम सामन्याचं ठिकाणही आलं समोर!

RR vs LSG Score Live IPL 2024: आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा रंगणार सामना; सॅमसन अन् राहुलच्या खेळीवर लक्ष