IPL 2022,  DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सने कोलकात्याचा चार विकेटने पराभव केला. कोलकात्याने दिलेले 147 धावांचे आव्हान दिल्लीने सहा गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार केले. कुलदीप यादव, मुस्तफिजुर रेहमान, डेविड वॉर्नर आणि रॉवमन पॉवेल दिल्लीच्या विजयाचे हिरो राहिले. कोलकात्याचा नऊ सामन्यातील हा सहावा पराभव आहे. तर दिल्लीचा आठ सामन्यातील चौथा विजय आहे. या विजयासाह दिल्लीचा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह सहाव्या क्रमांकवर पोहचला आहे. तर कोलकात्याचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. 


कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या तर मुस्तफिजुर रेहमान याने तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय डेविड वॉर्नर याने 42, रॉवमन पॉवेल याने 33 धावांची खेळी केली. यांच्या कामगिरीच्या जोरावर दिल्लीने विजय नोंदवला. 


कोलकात्याला 146 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने हे आव्हान 19 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. दिल्लीकडून डेविड वॉर्नर याने 42, ललीत यादव 22, रॉवमन पॉवेल 33 आणि अक्षर पटेल 24 धावांची खेळी केली. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, कर्णधार ऋषभ पंत यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. दिल्लीविरोधात उमेश यादवने भेदक मारा केला. उमेश यादवने चार षटकात 24 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. उमेश यादवने पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर आणि ऋषभ पंतला बाद केले. उमेश यादवचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला अचूक टप्यावर मारा करता आला नाही. 


नितीश राणाचे संयमी अर्धशतक, कोलकात्याची 146 पर्यंत मजल
नितीश राणाचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 42 धावांच्या बळावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या.  दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  दिलल्लीच्या गोलंदाजांपुढे कोलकात्याची फलंदाजी ढेपाळली. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरत कोलकात्याची तारांबळ उडवली. फिंच (3), वेंकटेश अय्यर (6), बाबा इंद्रजीत (6) आणि सुनिल नारायण (0) स्वस्तात माघारी परतले. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. 35 धावांत कोलकात्याने चार गडी गमावले होते. पण एका बाजूला कर्णधार श्रेयस अय्यर संयमी फलंदाजी करत होता. अय्यरने 42 धावांची संयमी फलंदाजी केली. अय्यरने नितीश राणासोबत मोलाची भागिदारी केली. अय्यर 42 धावांवर बाद झाला. अय्यरनंतर रसेलही शून्य धावसंख्येवर बाद झाला. कोलकात्याचा डाव लवकर संपुष्टात येईल असे वाटत असताना नितीश राणाने खिंड लडवली. राणाने 57 धावांची खेळी केली. रिंकू सिंह यानेही 23 धावांची छोटेखानी खेळी केली.