नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सपुढं 20 ओव्हरमध्ये 5  बाद 205  धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीला दीपक चहरनं पहिल्याच बॉलवर धक्का देत जॅक फ्रेजर मॅक्गर्गला खातं उघडू न देता बाद केलं. यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या मुंबईच्या इराद्यावर पाणी फेरण्याचं काम केलं. करुण नायरनं जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं.  करुण नायरनं 22 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करत दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली.  करुण नायर 5 षटकार आणि 12 चौकारांसह 89 धावा करुन बाद झाला. मात्र, त्यानं संघाला विजयाच्या वाटेवर पुढं नेऊन ठेवलं.

करुण नायरचं दमदार कमॅबक 

करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा खेळाडू, यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये 2018 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं विजेतेपद मिळवून दिलं. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. आजच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करुण नायरला खेळण्याची संधी मिळालीआणि त्यानं या संधीचं सोनं केलं. 

डावाच्या पहिल्याच बॉलवर सलामीवीर मॅक्गर्ग बाद झाल्यानंतर करुण नायर फलंदाजीला आला. करुण नायरनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु केली. मुंबईचा आणि टीम इंडियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जोरदार धुलाई करत धावा काढल्या. करुण नायरनं बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारले. करुण नायरनं जसप्रीत बुमराहच्या 9 बॉलमध्ये 21  धावा काढल्या. या दरम्यानच काळात करुण नायर आणि जसप्रीत बुमराहमध्ये छोटासा वाद देखील झाला. 

दिल्ली अजिंक्य राहणार?

अक्षर पटेलच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्सनं चार सामने जिंकले आहेत. यामध्ये त्यांनी लखनौ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आमने सामने आले आहेत. मुंबई इंडियन्सनं तिलक वर्माचं अर्धशतक, सूर्यकुमार यादव, रेयान रिकल्टन आणि नमन धीर यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 205  धावा केल्या. आज दिल्लीची गोलंदाजी अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकली नाही. कारण मिशेल स्टार्क या अनुभव गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, कुलदीप यादव, विपराज निगम आणि मुकेश कुमार यांच्या गोलंदाजीमुळं दिल्ली कॅपिटल्सला मुंबईला 205  धावांवर रोखण्यात यश आलं.