जयपूर :  विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुनं राजस्थानला पराभूत केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं राजस्थानला 9 विकेटनं पराभूत केलं. विराट कोहलीनं नाबाद 62  धावा केल्या. फिल सॉल्टनं 65 धावा तर देवदत्त पडिक्कलनं  40 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना आरसीबीला रोखण्यात अपयश आलं. फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीनं विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. आरसीबीनं 6 पैकी  4 सामन्यात विजय मिळवत 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.  दुसरीकडे राजस्थान रॉयल्स 6 पैकी चार सामन्यात पराभूत झाल्यानं त्यांची 7 व्या स्थानावर घसरण झाली आहे. 

राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेटवर 173 धावा केल्या होत्या.राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यानं चांगली  सुरुवात केली. संजू सॅमसन आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यशस्वी जयस्वालनं 75 धावांची खेळी केली. याशिवाय रियान परागनं  30  धावा केल्या. तर, ध्रुव जुरेलनं 35  धावा केल्या.

यशस्वी जयस्वालनं  7 चौकार आणि 1 षटकार मारत 47 बॉलमध्ये 75  धावांची खेळी केली.  राजस्थान रॉयल्सला शिमरोन हेटमायरकडून चांगल्या फंलदाजीची अपेक्षा होती मात्र तो केवळ 9  धावा करु शकला. अखेरच्या ओव्हरमध्ये ध्रुव जुरेलनं फटकेबाजी केल्यानं  आरआर 173 धावांपर्यंत पोहोचू शकला.

विराट कोहली आणि फिल सॉल्टचं एकहाती वर्चस्व

दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत बंगळुरुनं कमबॅक केलं. विराट कोहली आणि फिल सॉल्टनं आरसीबीला दमदार सुरुवात करुन दिली. विराट कोहली आणि फिल सॉल्टनं राजस्थानच्या गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाही. यामुळं आरसीबीचं मॅचवर एकहाती वर्चस्व राहिलं.

राजस्थानच्या पराभवाची मालिका सुरुच

राजस्थान रॉयल्सला यंदाच्या आयपीएलमध्ये अजून सूर सापडलेला नाही. 2024 च्या आयपीएलच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. पहिल्या तीन सामन्यात संघाचं नेतृत्त्व रियान परागनं केलं. त्यानंतर संघाचं नेतृत्त्व संजू सॅमसन करतोय. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानला केवळ 2 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. आता राजस्थान रॉयल्स आगामी सामन्यात विजयाच्या मार्गावर परत येणं शक्य होतं का ते पाहावं लागेल. 

विराट कोहलीचं अनोखं शतक

विराट कोहलीच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे. विराट कोहलीनं अर्धशतकांचं शतक नोंदवलं आहे. आता विराट कोहलीच्या पुढे डेव्हिड वॉर्नर आहे. त्यानं 109 अर्धशतकं केली आहेत.  विराटनं 39 बॉलमध्ये  2 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतक  पूर्ण केलं.