आयपीएल 2021: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2021 सीझनमध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे आणि त्याच्या जागी केन विल्यमसन याच्याकडे कर्णधारपद सोपवलं गेलं आहे. आता केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून दिसणार आहे. आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादने सहा सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला. पॉईंट टेबलमध्ये ही टीम अंतिम स्थानावर आहे. आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या टीमचं नेतृत्त्व करेल आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा कर्णधार म्हणून तो दिसणार आहे.


सनरायझर्स हैदराबाद या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी आणि आयपीएल 2021 च्या उर्वरित सर्व सामन्यांसाठी केन विल्यमसन कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारेल, अशी घोषणा सनरायझर्स हैदराबादने शनिवारी केली. या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "राजस्थान रॉयल्सविरुद्ध उद्याच्या सामन्यासाठी त्यांचे ओव्हरसीज कॉम्बिनेशन बदलण्याचा निर्णय टीम व्यवस्थापनाने घेतला आहे."



IPL 2021 | आगामी सीझनपूर्वी सनराइजर्स हैदराबाद संघाबाबत डेव्हिड वॉर्नरचा दावा; म्हणाला...


आयपीएलच्या 2016 सालच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएल करंडक जिंकला. या मोसमात हैदराबादची टीम विजयासाठी झगडत असल्याचं दिसतंय. वॉर्नरने आयपीएल 2021 च्या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांत 32.16 च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे केन विल्यमसनने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल विरुद्ध झालेल्या सामन्यात नॉट आऊट 66 आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात 26 धावांची जोरदार कामगिरी त्याने केली. विल्यमसनने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 108 धावा केल्या असून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. केन विल्यमसनकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना आशा आहे की टीम पॉईंट टेबलवर पुन्हा जोरदार कमबॅक करेल.


संबंधित बातम्या


SRH vs DC, Super Over: दिल्ली-हैदराबाद सामना टाय, सुपरओव्हरचा रोमांच, केन विल्यमसन, सुचितची धडाकेबाज खेळी 


IPL 2021 : टी नटराजनला संघाबाहेर ठेवल्यामुळे उठलं प्रश्नांचं वादळ, हैदराबाद संघ व्यवस्थापनानं दिलं 'हे' उत्तर