IPL 2025 Points Table : आयपीएल 2025 जिथे चाहत्यांना दररोज अनेक रोमांचक सामने पाहण्याची संधी मिळत आहे. चालू हंगामातील आतापर्यंत 18 सामने खेळले गेले आहेत. पण आयपीएलच्या सुरुवातीला आयपीएलमधील मोठ्या संघांनी खराब कामगिरी केली, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद, या तिन्ही संघांनी आयपीएलच्या सुरुवातीला 3-3 सामने गमावले आहेत. सततच्या पराभवांमुळे या संघांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (SRH)
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या आयपीएल 2025 मोहिमेची सुरुवात विजयाने केली, जेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. पण यानंतर, हैदराबाद संघाने आपली विजयी मालिका गमावली आणि पुढील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात हैदराबादने 286 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला असे वाटत होते की त्यांची फलंदाजी मजबूत आहे आणि ते आयपीएलमध्ये 300 धावांचा टप्पाही गाठू शकतात, परंतु त्यानंतर, संघाच्या फलंदाजांना काय झाले काय माहीत संघ 200 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. आता, त्यांचा सामना 6 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सशी होईल. अशा परिस्थितीत त्याचे लक्ष विजय नोंदवण्यावर असेल. जेणेकरून तो पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जाऊ शकेल.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. परंतु चालू हंगामात त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत संघाने चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन गमावले आहेत आणि फक्त एक जिंकण्यात यश आले आहे. दोन गुणांसह, त्याचा नेट रन रेट उणे 0.891 आहे आणि तो नवव्या क्रमांकावर आहे.
चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता, परंतु त्यानंतर सलग तीन सामने गमावून पराभवाची हॅटट्रिक झाली. चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर आरसीबीविरुद्ध 50 धावांनी पराभव पत्करावा लागला. आरसीबीने 17 वर्षांनंतर चेपॉक येथे सीएसकेचा पराभव केला. तर 2010 नंतर चेपॉक येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सीएसकेचा पराभव झाला. हा पराभव चेन्नईसाठी धोक्याची घंटा आहे.
मुंबई इंडियन्स (MI)
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या खेळला नाही, त्यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यानंतर, हार्दिक पंड्याने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले, परंतु त्याच्या कर्णधारपदामुळे संघाचे नशीब बदलू शकले नाही आणि गुजरात टायटन्सने त्यांना 36 धावांनी पराभूत केले. चालू हंगामात, मुंबईने आतापर्यंत फक्त केकेआरविरुद्ध विजय मिळवला आहे.
मुंबईने चालू हंगामात आतापर्यंत एकूण चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन गमावले आहेत आणि फक्त एक जिंकला आहे. दोन गुणांसह, त्याचा नेट रन रेट अधिक 0.108 आहे. तो पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.