IPL 2025 Mega Auction MS Dhoni CSK : आयपीएल 2025 सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. मात्र, लीगच्या 18 व्या हंगामाबाबत नवीन नियम समोर आले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळताना दिसणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.


दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या पुढील हंगामात खेळण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्सने पुष्टी केली आहे की ते धोनीशी कायम ठेवण्याबाबत चर्चा करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझी आणि धोनी यांच्यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात बैठक होऊ शकते.


अलीकडेच आयपीएल बैठकीत जुना नियम परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियमानुसार 5 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या निवृत्त खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू मानले जाईल. सर्व फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडू ठेवू शकतात.


यापैकी जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडू असतील, ज्यासाठी फ्रँचायझीला 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत धोनी सीएसकेमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून सामील होण्याची शक्यता आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, धोनी अमेरिकेतून परतला आहे. येत्या एक किंवा दोन आठवड्यांत ते CSK व्यवस्थापनाशी चर्चा करू शकतात. जर धोनीने चेन्नई सोबत 4 कोटींची डील केली तर त्याचे मोठे नुकसान होईल. कारण या आधीच्या हंगामात धोनीला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते.


चेन्नई नक्कीच धोनीला कायम ठेवेल, अशी शक्यता भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने व्यक्त केली आहे. जिओ सिनेमाशी बोलताना तो म्हणाला होता, "एमएस धोनी नक्कीच चेन्नईत असेल. यात काही शंका नाही. विशेषत: कारण तो आता अनकॅप्ड खेळाडू आहे. त्याने संघासाठी खूप काही केले आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चांगला खेळत आहे. अशा परिस्थितीत संघ त्याला कायम ठेवू शकतो. याशिवाय रवींद्र जडेजाही संघात राहू शकतो.


राईट टू मॅच कार्ड सीएसकेसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्रा याने व्यक्त केला. तो म्हणाला, सीएसके पाच खेळाडूंना कायम ठेवेल असे मला वाटत नाही. ते तीन किंवा चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. मला वाटते ऋतुराज आणि जडेजा 18 कोटींच्या श्रेणीत असतील. जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला एवढी किंमत मोजावी लागेल. याशिवाय ते धोनी, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांना घेऊ शकतात.