Mumbai Indians beat Delhi Capitals : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि यासह आयपीएल प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. तर या पराभवामुळे दिल्ली प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. या सामन्यात एमआय संघाने प्रथम फलंदाजी करत 180 धावा केल्या. मुंबईने शेवटच्या 2 षटकांत 48 धावा जोडून ही मोठी धावसंख्या उभारली होती, त्यानंतर दिल्लीला फक्त 121 धावा करता आल्या. मुंबईच्या विजयाचे हिरो सूर्यकुमार यादव, बुमराह आणि सँटनर ठरले.
आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब!
दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. हा सामना 24 मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. प्लेऑफमध्ये पोहोचणारे 4 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नंतर मुंबई आता प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला आहे.
शेवटच्या दोन षटकांत ठोकल्या 48 धावा!
सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली आणि 43 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 73 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीदरम्यान, सूर्यकुमारने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्य कुमार आणि नमन धीर यांनी शेवटच्या दोन षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांना फटकारले आणि एकूण 48 धावा केल्या. याच्या मदतीने एमआयने सामन्यात पुनरागमन केले. नमनने 8 चेंडूत 24 धावा करत नाबाद राहिला. याशिवाय तिलक वर्माच्या फलंदाजीतून 27 धावांची महत्त्वाची खेळी आली. अशाप्रकारे, पूर्ण षटके खेळल्यानंतर मुंबईने 5 विकेट गमावून 180 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
मुंबईच्या गोलंदाजासमोर दिल्लीने टेकले गुडघे!
181 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात पण काही खास झाली नाही. दुसऱ्याच षटकात दीपक चहरने कर्णधार फाफला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फाफच्या बॅटमधून फक्त 6 धावा आल्या. यानंतर, तिसऱ्या षटकात बोल्टने केएल राहुललाही बाद केले. त्यानंतर अभिषेक पोरेल देखील चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याला विल जॅक्सने तंबुत पाठवले. यानंतर सँटनरने विप्रजला आऊट केले आणि दहाव्या षटकात दिल्लीला पाचवा धक्का बसला, जेव्हा स्टब्सला बुमराहने आऊट केले. यानंतर, समीर रिझवी आणि आशुतोष यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण 15 व्या षटकात सँटनरने त्यालाही आऊट केले. समीरने 39 धावा केल्या.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर यांनी शानदार गोलंदाजी केली. सँटनरने 4 षटकांत 11 धावा देऊन 3 फलंदाजांना आऊट केले. जसप्रीत बुमराहनेही 3.2 षटकांत 12 धावा देत 3 विकेट घेतले.