नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅच कोण जिंकणार याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं 20 ओव्हरमध्ये 188 धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्सनं देखील 188 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये 9 धावा हव्या होत्या. मात्र, मिशेल स्टार्कनं केवळ 8 धावा देत मॅच सुपर ओव्हरपर्यंत नेली. यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणाच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानचा संघ 188 धावांपर्यंत पोहोचला. यामुळं मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये ठरेल.
ध्रुव जुरेलच्या एका चुकीनं मॅच सुपरओव्हरमध्ये
दिल्ली कॅपिटल्सनं 188 धावा केल्यानंतर राजस्थानला विजयासाठी 189 धावांची गरज होती. संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल या दोघंनी चांगली सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी 76 धावांची सलामीची भागिदारी केली. संजू सॅमसन यानं 31 धावा केल्यानंतर तो दुखापतीमुळं बाहेर गेला. यानंतर नितीश राणा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी अर्धशतकं झळकावली आणि संघाला विजयाजवळ नेलं. कुलदीप यादवनं यशस्वी जयस्वालला 51 धावांवर बाद केलं. तर, नितीश राणाला मिशेल स्टार्कनं 51 धावांवर बाद केलं. यानंतर हेटमायर आणि ध्रुव जुरेलनं राजस्थानला विजयाजवळ नेलं. शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानला विजयासाठी 9 धावा हव्या होत्या. मात्र, मिशेल स्टार्कनं 8 धावा दिल्या आणि मॅचचा निकाल सुपर ओव्हरपर्यंत गेला. स्टार्कच्या पाचव्या बॉलवर राजस्थानला दोन धावा घ्यायची संधी होती. मात्र, ध्रुव जुरेलनं एक रन घेतली. पुढच्या बॉलवर दोन धावांची गरज असताना राजस्थानला एक रन करता आली आणि मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली.
दिल्लीच्या 188 धावा
राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. मॅक्गर्क आणि करुण नायर लवकर बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेल आणि केएल राहुल या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला. अभिषेक पोरेलनं 49 धावा केल्या तर केएल राहुल यानं 38 धावा केल्या.मात्र, अभिषेक पोरेलनं 37 बॉलमध्ये 49 तर केएल राहुलनं 32 बॉलमध्ये 34 धावा केल्या. पोरेल आणि राहुलनं 63 धावांची भागीदारी केली. अभिषेक पोरेल यानं दिल्लीकडून सर्वाधिक 49 धावा केल्या तर अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 34 धावा केल्या. तर, आशुतोष शर्मानं 15 धावा केल्यानं संघानं 20 ओव्हरमध्ये 188 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 76 धावा दिल्यानं दिल्लीचा संघ 20 ओव्हरमध्ये 5 बाद 188 धावांपर्यंत पोहोचला.