नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सकडून 2024 च्या हंगामात दमदार फलंदाजी करणारा जॅक फ्रेज मॅक्गर्क (Jake Fraser Mcgurk) याच्यासाठी आयपीएल 2025 निराशाजनक ठरतंय. जॅक फ्रेज मॅक्गर्कला आजच्या सहाव्या मॅचपर्यंत दमदार कामगिरी करता आलेली नाही. राजस्थान विरुद्ध देखील जॅक फ्रेज मॅक्गर्कला मोठी कामगिरी करता आली नाही. या सहा सामन्यांमध्ये मॅक्गर्कच सर्वोच्च धावसंख्या 38 इतकी राहिली आहे. तर, इतर पाच डावांमध्ये त्याला दोन अंकी धावा देखील करता आल्या नाहीत. 

दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत 5 पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. दिल्लीच्या संघाची कामगिरी चांगली असल्यानं मॅक्गर्कच्या कामगिरीची फारशी चर्चा होत नाही. चार मॅचेसमध्ये विजय मिळवल्यानं आणि फाफ डु प्लेसिस दुखापतग्रस्त असल्यानं त्याला संधी मिळतेय. जर फाफ डु प्लेसिस फिट झाला तर मॅक्गर्कचा संघातून पत्ता कट होऊ शकतो. 

आजच्या मॅचमध्ये जॅक फ्रेज मॅक्गर्कनं चांगली सुरुवात केली होती. मात्र, तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्यानं केवळ 9 धावा केल्या. मॅक्गर्कनं  जोफ्रा आर्चरला सलग  दोन चौकार मारले. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 9 धावा केल्या. मात्र, तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मॅक्गर्क बाद झाला. 

जॅक फ्रेज मॅक्गर्कनं दिल्ली कॅपिटल्ससाठी या हंगामात सहा सामन्यात 55 धावा केल्या आहेत. मॅक्गर्कनं या हंगामात 1,38,0,7,0,9  धावा केल्या आहेत.  गेल्य हंगामात जॅक फ्रेज मॅक्गर्कचं स्ट्राईक रेट 234 इतकं होतं, या हंगामात ते 105 वर आलं आहे. आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या हंगामात मॅक्गर्कनं  9 मॅचेसमध्ये 330 धावा केल्या होत्या. या हंगामात त्या प्रकारची कामगिरी करण्यात त्याला अपयश आलं आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये मॅक्गर्कला संधी मिळणार का ते पाहावं लागेल. पुढील सामन्यात अक्षर पटेल त्याला डच्चू देऊ शकतो. दिल्ली कॅपिटलनं मॅक्गर्कला 9 कोटी रुपये खर्चून संघात घेतलं होतं.      

जॅक फ्रेज मॅक्गर्क आयपीएलच्या 2025 च्या हंगामात एकेरी धावसंख्येवर सर्वाधिक वेळा बाद होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेल  दुसऱ्या तर आंद्रे रसेल तिसऱ्या स्थानावर आहे. क्विंटन डिकॉक चौथ्या स्थानावर आहे. 

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 5  बाद 188  धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 189 धावांची गरज आहे. राजस्थाननं चांगली सुरुवात केली असून मॅचचा निकाल नेमका काय लागतो ते पाहावं लागेल.