IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला (CSK) बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला.
धोनी आणि चेन्नईचे खेळाडू आरसीबीच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन करण्यासाठी थांबले होते. मात्र, आरसीबीचे खेळाडू जल्लोष करत असल्यानं धोनीनं आरसीबीच्या सपोर्ट स्टाफला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो निघून गेला. यानंतर कोहली धोनीला भेटण्यासाठी चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला. यावेळी दोघांची भेट झाली आणि धोनीने कोहलीला शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान तुम्ही अंतिम सामन्यात प्रवेश केला पाहिजे, आणि अंतिम सामना जिंकायला देखील हवा, असं म्हणत धोनीने कोहलीला शुभेच्छा दिल्या.
धोनीच्या शोधात कोहली चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये-
चेन्नई आणि बंगळुरुच्या या सामन्यातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. कोहलीच्या आधी धोनी हात न मिळवताच चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. यावेळी दोघांची भेटही झाल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसत आहे. धोनी आणि विराटची चांगली मैत्री आहे. याबाबत विराटने अनेकदा उघडपणे भाष्य देखील केले आहे.
बंगळुरुचा राजस्थानविरुद्ध होणार सामना-
आयपीएलच्या गुणतालिकेत बंगळुरुचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरु आणि राजस्थानचा 22 मे रोजी एलिमिनेटरचा सामना रंगेल. एलिमिनेटरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे. या सामन्यात विजयी झालेला संघ 24 मे रोजी क्वालिफायर 2 चा सामना खेळेल.
बंगळुरुने तीनवेळा खेळलाय अंतिम सामना-
बंगळुरुचा संघ तीनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात दाखल झाला होता. परंतु बंगळुरुला जेतेपद पटकावण्यात यश मिळाले नाही. यंदा आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकवण्यासाठी बंगळुरुचा संघ खूप उत्सुक आहे. बंगळुरुने सगळ्यात पहिले 2009 साली अंतिम सामना खेळला होता. यानंतर 2011 आणि 2016 साली बंगळुरुने अंतिम सामना खेळला होता.
प्ले ऑफचं वेळापत्रक
21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 विजेता, चेन्नई ( फायनल)