मुंबई : टीम इंडियाचा आक्रमक बॅटसमन, टी-20 संघाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलामीवीर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) इन्स्टाग्राम स्टोरीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर क्रिकेटपासून दूर आहे. 2024 चा आयपीएलचा (IPL 2024) हंगाम सुरु होण्यास तीन दिवसांचा कालावधी बाकी असतानाच सूर्यकुमार यादवनं ठेवलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीनं चाहत्यांना धक्का बसला आहे.
सूर्यकुमार यादव सध्या आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र, यावर्षी त्यानं एकही टी-20 मॅच खेळलेली नाही. टीम इंडिया डिसेंबर-जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती, त्यासाठी त्याला मॅन ऑफ द सीरिज म्हणून देखील गौरवण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना सूर्यकुमार यादवच्या पायावर ताण आल्यानं तो दुखापतग्रस्त झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती.
सूर्यकमार यादव 2024 च्या आयपीएलमध्ये कमबॅक करेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याचं चित्र आहे. मुंबई इंडियन्सचे कोच मार्क बाऊचर यांना सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या संपर्कात मुंबई इंडियन्स असल्याचं म्हटलं होतं.
सूर्यकुमार यादवनं इन्स्टाग्राम स्टोरीवर तुटलेलं ह्रदयाची इमोजी ठेवली आहे. यामुळं चाहत्यांकडून सूर्या आयपीएलच्या पूर्ण स्पर्धेबाहेर जातो की काय, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवनं चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तो वर्क आऊट करताना दिसून आला होता.
सूर्यकुमार यादवची आयपीएल कारकीर्द
सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी मुंबई इंडियन्सकडून मिळाली होती. 2012 मध्ये सूर्यकमार यादवनं आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर पुढच्या हंगामात त्याला मुंबईनं वगळलं होतं. 2014 ते 2017 पर्यंत सूर्यकुमार यादव कोलकाता नाईट रायडर्सकडे होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध केलेल्या 20 बॉलमध्ये 46 धावांच्या वादळी खेळीनं तो चर्चेत आला होता. 2018 मध्ये सूर्या पुन्हा मुंबईच्या टीममध्ये परतला.
सूर्यासाठी 2020 चं आयपीएल गेमचेंजर ठरलं होतं. मुंबई इंडियन्सकडून त्यानं त्या हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमारसाठी मार्च 2021 टीम इंडियाची दार उघडली. सूर्यकुमारनं इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं. ऑक्टोबर 2022 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये पहिलं स्थान पटकावणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
दरम्यान,आयपीएलच्या 2024 च्या हंमागात मुंबई इंडियन्सची पहिली मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. सूर्यकुमार यादव या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. रविवारी 24 मार्च रोजी गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशल स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात आमने सामने असेल.
संबंधित बातम्या :