IPL 2024 SRH vs PBKS LIVE Score: प्रभसिमरनचे अर्धशतक, अथर्व तायडे आणि रायली रुसो यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 214 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून प्रभसिमरन याने 71, अथर्व तायडे 46 आणि रायली रुसो याने 49 धावांची खेळी केली. हैदराबादकडून नटराजन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 215 धावांची गरज आहे.
पंजाबची वादळी सुरुवात -
शिखर धवन आणि सॅम करन यांच्या अनुपस्थितीमध्ये जितेश शर्माने आज पंजाबची धुरा संभाळली. जितेश शर्माने हैदाराबादमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचे सलामी फलंदाज अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी वादळी सुरुवात केली. तायडे आणि प्रभसिमरन यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी 9.1 षटकात 97 धावांची भागिदारी केली. अथर्व तायडे याने चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वेगाने वाढवली, दुसरीकडे प्रभसिमरनही फटकेबाजी करत होता.
तायडेची फटकेबाजी, प्रभसिमरनचे वादळ -
अथर्व तायडे यानं फक्त 27 चेंडूमध्ये 46 धावांचा पाऊस पाडला. त्याचं अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. पण त्याने आपल्या फटकेबाजीने सर्वांची मनं जिंकली. विदर्भाच्या अथर्व तायडे याने आपल्या वादळी खळीमध्ये दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. तर प्रभसमिरन याने वादळी 71 धावांची खेळी केली. प्रभसिमरन याने हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. प्रभसमिरन आणि रायली रुसो यांच्यापुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवत दिसत होती. प्रभसिमरन याने 45 चेंडूमध्ये 71 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीमध्ये चार षटकार आणि सात चौकार ठोकले.
रायली रुसोचे अर्धशतक हुकले -
रायली रुसो याचं अर्धशतक फक्त एका धावेनं हुकले. त्याला 49 धावांवर पॅट कमिन्स याने बाद केले. रायली रुसो याने 24 चेंडूत 204 च्या स्ट्राईक रेटने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. रुसोच्या फटकेबाजीसमोर हैदराबादच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली होती. रायली रुसो याने आपल्या वादळी फलंदाजीमध्ये चार षटकार आणि तीन चौकाऱ ठोकले.
पंजाबची फलंदाजी ढेपाळली -
चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. शशांक सिंह फक्त दोन धावा काढून धावबाद झाला. तर आशुतोष शर्मा मोठा फटका माऱण्याच्या नादात दोन धावांवर बाद झाला. रायली रुसो याचा जम बसला होता, फटकेबाजी करत होता. पण त्याला अखेरपर्यंत खेळता आले नाही. अखेरीस जितेश शर्मा आणि शिवम सिंह यांनी फटकेबाजी करत पंजाबची धावसंख्या 200 पार पोहचवली. कर्णधार जितेश शर्माने 15 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले.
हैदराबादची गोलंदाजी -
टी नटराजन हैदराबादकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. नटराजन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि विजयकांत यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, शाहबाज अहमद आणि नितीश रेड्डी यांच्या विकेटची पाटी कोरी राहिली.