मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात निराशाजनक झाली आहे. सलग तीन पराभव स्वीकारणाऱ्या मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करतोय. मुंबईच्या फलंदाजांची  कामगिरी देखील म्हणावी तशी चांगली झालेली नाही. एकीकडे कॅप्टन हार्दिक पांड्या विरुद्ध होत असलेली प्रेक्षकांची शेरेबाजी आणि संघाचे होत असलेले पराभव यामुळं मुंबईचं टेन्शन वाढलेलं आहे. या पार्श्वभूमीवर संघाला दिलासा देणारी बातमी समोर आलीय ती म्हणजे मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फिट झाला आहे. सूर्यकुमार यादवला नॅशनल क्रिकेट अकादमीकडून फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. आता सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीमसोबत असेल. सूर्यकुमार यादव दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये खेळेल की नाही यासंदर्भात अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही. 


सूर्याचं कमबॅक मुंबईला दिलासा


मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर फलंदाजी करतो. आता तो कमबॅक करत असल्यानं मुंबईला मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सूर्यकुमार यादव संघाबाहेर होता. डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं होतं. त्या स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. आता सूर्यकुमार यादव फिट झाल्यानं मुंबईला दिलासा मिळाला आहे. 


सूर्यकुमार यादव कितव्या स्थानी फलंदाजी करणार?


सूर्यकुमार यादव संघात नसल्यानं चौथ्या स्थानावर फलंदाजी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता सूर्यकुमार संघात परतल्यानं तो चौथ्या स्थानी फलंदाजी करेल आणि तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल. 


सूर्याची एंट्री कुणाला डच्चू ?


मुंबई इंडियन्सला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. अहमदाबादला गुजरात टायटन्स, हैदराबादला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्स पराभूत झाले होते.सूर्यकुमार यादव संघात नसल्यानं मुंबई इंडियन्सनं नमन धीर याला संधी दिली होती. नमन धीरनं चांगली कामगिरी देखील केली होती. आता मात्र, सूर्यकुमार यादव संघात येत असल्यानं कोणत्यातरी भारतीय खेळाडूला बाहेर बसवावं लागणार असल्यानं मुंबई इंडियन्स नमन धीरला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. 


दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या आगामी तीन लढती वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि  चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध मुंबईच्या तीन मॅचेस होम ग्राऊंडवर होणार आहेत. 


संबंधित बातम्या :


IPL 2024, GT vs PBKS Toss Update : शिखर धवननं टॉस जिंकला, पंजाब पहिल्यांदा बॉलिंग करत गुजरातला रोखणार


IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग तीन मॅचमध्ये पराभव, रोहितच्या संघानं चार मॅच गमावल्यानंतरही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलेलं