Nitish Rana And Middle Finger: आयपीएल 2024 चा हंगाम कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) फलंदाज नितीश राणासाठी (Nitish Rana) काही खास नव्हते. बोटाच्या दुखापतीमुळे तो बहुतांश सामन्यांतून बाहेर राहिला. गेल्या हंगामात (IPL 2023), नितीशने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कोलकाता नाइट रायडर्सची जबाबदारी स्वीकारली होती. या हंगामात (IPL 2024) श्रेयस अय्यर परतला आणि आता तो संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, नितीश राणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हर्षा भोगले यांनी नितीश राणाला त्याच्या बोटाला दुखापत झाल्याबद्दल विचारले. नितीश म्हणाले की, मी तुम्हाला ते बोट दाखवू शकत नाही कारण ते मधले बोट आहे. आयपीएल 2024 चा 63 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार होता, परंतु पावसामुळे हा सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
हर्षा भोगले आणि नितीश राणा यांच्यातील संभाषणाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हर्षा भोगले नितीश राणाला म्हणाले, "साधारणपणे मुलाखतीत मी चेहरा पाहतो, पण माझी नजर तुझ्या हाताकडे जाते, सर्व काही ठीक आहे?" यावर उत्तर देताना नितीश राणा म्हणाले, "सर, ठीक आहे, पण मी ते बोट दाखवू शकत नाही कारण ते मधले बोट आहे. पण हो, पूर्वीपेक्षा खूप चांगले आहे."
दुखापतीमुळे 10 सामने हुकले
नितीश राणा बोटाच्या दुखापतीमुळे 10 सामने खेळू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने पहिला सामना खेळला होता, ज्यामध्ये तो जखमी झाला होता. यानंतर नितीशने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 10 सामन्यांचा ब्रेक घेत पुनरागमन केले. मुंबईविरुद्ध नितीशने 23 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावांची खेळी केली होती. नितीशच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला संधी देण्यात आली.
केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र-
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आधीच स्पर्धेच्या पुढील फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्ससोबतचा सामना रद्द झाल्यामुळे गुजरात टायटन्सही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला. तर केकेआर चे 19 गुण झाले आहेत आणि राजस्थान रॉयल्स वगळता अन्य कोणताही संघ एवढ्या गुणांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र ठरला आहे.