चंदीगड : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) काल तिसरा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जला (Punjab Kings) 9 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्समध्ये दोन गट असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सनं नेतृत्त्वाची संधी हार्दिक पांड्याला दिली होती. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्यावर शेरेबाजी केली होती. काल झालेल्या मॅचसंदर्भात मुंबई इंडियन्सचा खेळाडू मोहम्मद नबीनं (Mohammad Nabi) एका दुसऱ्या इन्स्टाग्राम यूजरची स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीनं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


मोहम्मद नबीनं कालच्या मॅचमध्ये एकही ओव्हर टाकलेली नव्हती. यामुळं क्रिकेटचे जाणकार देखील हैराण झाले होते. मोहम्मद नबीनं एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. यामध्ये बॉलिंग न दिल्याबद्दल नबीनं हार्दिक पांड्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दुसऱ्या यूजरची स्टोरी शेअर केली होती.  काही वेळानंतरचं मोहम्मद नबीनं स्टोरी हटवली.यामुळं मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 






मोहम्मद नबीनं शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीत त्या यूजरनंअसं म्हटलं होत की, तुमच्या कॅप्टनचे काही निर्णय अनाकलनीय आणि लोकांना आश्चर्याचा धक्का देणारे असतात. नबीला आज एकही ओव्हर देण्यात आली नाही, असं त्या स्टोरीत म्हटलं गेलं होतं. 


दरम्यान, मोहम्मद नबीनं शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांनी स्क्रीन शॉट काढून ठेवले होते. या प्रकरणाचा आधार घेत काही जणांनी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे. 


मोहम्मद नबीनं मुंबई इंडियन्सला टॅक करत चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नांची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्यानं खळबळ उडालीय. या प्रकरणामुळं मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये खरंच एकी आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंमध्ये एकी निर्माण व्हावी म्हणून टीम मॅनेजमेंटनं देखील विशेष प्रयत्न केले होते. मात्र, त्यात देखील यश आलं नसल्याचं समोर आलं आहे. 


मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत झेप


मुंबई इंडियन्सनं काल पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सनच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चार पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. मुंबई आता सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मुंबईची पुढील लढत जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.  


संबंधित बातम्या:


IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर


Hardik Pandya : ... तर तुम्ही चाहत्यांची मनं जिंकाल, हार्दिक पांड्याला भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा कानमंत्र