IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyadrabad) आयपीएल 2024 चा चौथा विजय नोंदवला. हंगामातील 55 व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. हा विजय मुंबईसाठी खूप खास होता, कारण या विजयासह संघाने स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. मात्र, येथून प्लेऑफसाठी पात्र ठरणे मुंबईसाठी कठीण काम आहे.
हैदराबादला पराभूत केल्यानंतर, मुंबईचा संघ 8 गुण आणि -0.212 च्या नेट रनरेटने गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर होता. मुंबईने या हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये 4 सामन्यात विजय आणि 8 सामन्यात पराभव झाला आहे. अशा स्थितीत येथून प्लेऑफसाठी पात्र ठरणे संघासाठी सोपे नसेल.
कुठल्या समीकरणाने मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतो? (IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario)
सर्वप्रथम मुंबई इंडियन्सला त्यांचे उर्वरित दोन सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. जर संघ एकही सामना गमावला तर तिथून त्यांचा प्ले ऑफचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात येईल. पुढील दोन सामन्यांमध्ये मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. दोन्ही सामने जिंकून मुंबईला 12 गुण मिळू शकतात. सध्या हैदराबाद, लखनौ आणि चेन्नईचे 12-12 गुण आहेत. अशा परिस्थितीत यातील दोन संघांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने हरल्यास मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग खुला राहील.
उर्वरीत दोन सामन्यात मोठ्या विजयाची गरज-
मुंबईला पुढील दोन सामन्यांमध्ये केवळ विजयाची गरज नाही तर मोठ्या विजयाची गरज आहे, कारण सध्या संघाचा नेट रनरेट -0.212 आहे. अशा स्थितीत, संघाला मोठा विजय मिळवून धावगती सुधारावी लागेल, जेणेकरून नेट रनरेटद्वारे इतर संघांना मागे टाकून पात्रता मिळवता येईल. आता येथून मुंबई प्रत्यक्षात प्ले ऑफसाठी पात्र ठरते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो-
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर हैदराबादला 7 गड्यांनी नमवले. सूर्यकुमार यादवने झंझावाती नाबाद शतक ठोकत मुंबईचा विजय साकारला. हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 173 धावांवर रोखल्यानंतर मुंबईने 17.2 षटकांत 3 बाद 174 धावा केल्या. 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 31 धावांमध्ये मुंबईने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. इशान किशन 9, रोहित शर्मा 4 आणि नमन धीर 0 स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर मात्र सूर्याचा शो सुरु झाला. सूर्यानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला आणि मुंबईला विजय मिळवून दिला.