मुंबई :  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आज वानखेडे स्टेडियमवर आमने सामने येत आहेत. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये चार पैकी एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं देखील पाच पैकी एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघात श्रेयस गोपालला संधी देण्यात आल्याची माहिती हार्दिक पांड्यानं दिली आहे. आरसीबीनं तीन बदल केले असून विली जॅक्स, महिपाल लोम्रोर आणि विजयकुमार व्यषकला संघात स्थान दिलं आहे.


विजयाची गुढी कोण उभारणार?


मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज वानखेडे स्टेडियवर अकराव्या वेळी आमने सामने येणार आहेत. यापूर्वी झालेल्या 10 सामन्यांमध्ये मुंबईचं वर्चस्व राहिलं आहे. मुंबई इंडियन्सनं सात मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे आरसीबीनं तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये कोण विजय मिळवणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 


मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा, कॅप्टन हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर लक्ष आहे. या तिघांनी चांगली कामगिरी केल्यास मुंबईचा विजयाचा मार्ग सोपा होईल. दुसरीकडे आरसीबीचं लक्ष कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या कामगिरीवर असेल.   


विराट कोहली फॉर्म कायम ठेवणार?


विराट कोहलीनं गेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक केलं होतं आज देखील बंगळुरुला देखील अशाच कामगिरीची आशा असेल. विराट कोहलीला आरसीबीच्या इतर फलंदाजांची साथ मिळत नसल्याचं यापूर्वी च्या मॅचमध्ये दिसून आलं होतं. आज तरी आरसीबीचे इतर फलंदाज चांगली फलंदाजी करणार का हे पाहावं लागेल. दुुसरीकडे मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीवर देखील सर्वांच लक्ष लागलंय. 


 


मुंबई इंडियन्सची टीम 


रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा,टीम डेव्हिड, रोमॅरिओ शेफर्ड, मोहम्मद नबी, पियूष चावला, गेराल्ड कोत्झी, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल,


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान,   रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, मयंक डागर, रेईस टॉपली, मोहम्मद सिराज, यश दयाळ, विली जॅक्स, महिपाल लोम्रोर, विजय व्यषक