MI vs RCB Head To Head : वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यामध्ये आज आमना सामाना (Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru at Wankhede Stadium) होणार आहे. मुंबई आणि आरसीबी संघाला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे. मुंबई दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईला आरसीबीचा पराभव करणं सोप्पं जाणार नाही. एकूण हेड टू हेड आकडेवारीमध्ये मुंबईचे पारडे जड आहे. पण मागील पाच सामन्यात आरसीबीचं वर्चस्व दिसतेय. आयपीएलमध्ये मागील पाच सामन्यात आरसीबीने मुंबईचा चार वेळा पराभव केला आहे. मुंबईला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय. आरसीबीविरोधात मुंबईला लागोपाठ चार सामने गमावावे लागले, पण गतवर्षी अखेरच्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा पराभव केला. आयपीएलचे एकूण हेड टू हेड आकडे पाहिल्यास मुंबईचे पारडे जड दिसतेय. 


MI आणि RCB : हेड टू हेड आकडे काय सांगतात ?


आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये 32 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 18 वेळा मुंबईने बाजी मारली आहे, तर 14 वेळा आरसाबीचा विजय झाला आहे. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे,  या मैदानावर मुंबईचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये मुंबई आणि आरसीबीची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत. आरसीबीला पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय, तर मुंबईला चार सामन्यात एका विजयावर समाधान मानावे लागले आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. 


हेड टू हेड आकडे पाहिले तर मुंबईने 18 सामन्यात विजय मिळवलाय. मुंबईचे पारडं जड मानले जातेय. पण मागील पाच सामन्यात आरसीबीचं वर्चस्व दिसतेय. आज कोण बाजी मारणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल.  


आरसीबीला पहिल्या आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा


दिग्गजांचा भरणा असलेल्या आरसीबीला आतापर्यंत एकाही स्पर्धेत चषकावर नाव कोरता आले नाही. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात पहिला आयपीएल चषक जिंकण्यासाठी आरसीबीकडून प्रयत्न केले जात आहेत. आरसीबीने आतापर्यंत तीन वेळा फायनलमध्ये धडक मारली, पण पदरी निराशाच आहे.  2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. यंदाच्या हंगामातही आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली.  प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला आता विजयाच्या पटरीवर परत यावं लागणार आहे. दुसरीकडे मुंबईने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय.  2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईने आयपीएल चषकावर नाव कोरलेय. आता सहाव्या चषकासाठी मुंबई प्रयत्नशील आहे.