Highest innings score in IPL: ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकांमध्ये 277 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीसमोर मुंबईच्या एकाही गोलंदाजाची दाळ शिजली नाही. बुमराह, हार्दिक, कोइत्जे, पियूष चावला यासारखे दिग्गज फेल गेले. ट्रेविस हेड 62, अभिषेक शर्मा 63, हेनरिक क्लासेन नाबाद 80 आणि एडन मार्करम नाबाद 42 धावांचा पाऊस पाडला. मुंबईकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. मुंबईला सामना जिंकण्यासाठी तब्बल 278 धावांचे विराट आव्हान असेल. 


ट्रेविस हेडची वादळी सुरुवात - 


2023 मध्ये झालेल्या विश्वचषकात ट्रेविस हेड याने भारताकडून विजय हिसकावला होता. आता आयपीएलमध्ये हेड याने मुंबईची गोलंदाजी फोडली. ट्रेविस हेड याने पहिल्याच चेंडूपासून मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मयांक अग्रवाल फक्त 11 धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर हैदराबादच्या धावसंख्येची गाडी वेगाने पळाली. ट्रेविस हेड याने 18 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. ट्रेविस हेड याने चौफेर फटकेबाजी केली. हेड याला कोइत्जे यानं तंबूत पाठवलं. तोपर्यंत हेड याने 24 चेंडूमध्ये 62 धावांचा पाऊस पाडला.  या खेळीमध्ये हेडने तीन षटकार आणि 9 चौकार लगावला. हेड याला पाच धावांवर जिवनदान मिळाले होते, त्याचा फायदा त्याने घेतला. ट्रेविस हेडने मयांक अग्रवाल याच्यासोबत 45 तर अभिषेक शर्मासोबत 68 धावांची भागिदारी केली. 


अभिषेकचा झंझावत - 


युवा अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या मैदानात षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेक शर्माने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्मापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी वाटली. अभिषेख शर्माने 23 चेंडूमध्ये 63 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने 7 षटकार आणि3 चौकार लगावले. अभिषेक शर्माने ट्रेविस हेड याच्यासोबत 68 धावांची भागिदारी केली. तर मार्करमसोबत 48 धावा जोडल्या. 


क्लासेनचं वादळ - 


कोलकात्याविरोधात जिथं खेळ थांबवला, तिथेच हेनरिक क्लासेन याने खेळाला सुरुवात केली. हेनरिक क्लासेन याने प्रत्येक चेंडूवर चौफेर फटकेबाजी केली. क्लासेन याने मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. क्लासेन आणि मार्करम यांच्यामध्ये 55 चेंडूमध्ये 116 धावांची नाबाद भागिदारी झाली. यामध्ये क्लासेनचं योगदान 34 चेंडूमध्ये 80 धावांचे राहिले. हेनरिक क्लासेन याने 235 च्या स्ट्राईक रेटने फकटेबाजी केली. क्लासेन याने 34 चेंडूमध्ये 80 धावांचा पाऊस पाडला. आपल्या खेळीला 7 षटकार आणि चार चौकारांचा साज होता. 


मार्करमची शानदार फलंदाजी - 


एडन मार्करम यानं एका बाजूला संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. मार्करम याने आधी अभिषेक शर्माला साथ दिली, नंतर क्लासेनसोबत मोठी भागिदारी केली. एडन मार्करम याने 28 चेंडूमध्ये 42 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. 


मुंबईची गोलंदाजी फोडली - 


हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. बुमराह, हार्दिक, कोइत्जे, पियूष चावला सगळेच फेल गेले. हार्दिक पांड्या, कोइत्जे आणि पियुष चावला यांनी प्र्तेयकी एक एक विकेट घेतली.