Deepak Chahar on Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने (CSK) यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार सुरुवात केली आहे. सीएसकेनं (CSK) पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. आरसीबी आणि गुजरात संघाचा चेन्नईने (CSK vs RCB) सहज पराभव करत आपलं वर्चस्व कायम राखलेय. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई संघात मोठे बदल झाले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे एमएस धोनीने ऋतुराज गायकवाड याला सन्मानपूर्वक कर्णधारपद बहाल केले. पण चेन्नईच्या खेळाडूंची मात्र गोची होत आहे. कारण, कधी धोनीकडे पाहावं लागतेय, तर कधी ऋतुराज गायकवाडकडे.. कुणाचं ऐकायचं याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असतात. वेगवान गोलंदाज दीपक चाहर यानं आपल्या मनातील संभ्रम बोलून दाखवला. ऋतुराज गायकवाडचे कौतुकही दीपक चाहर याने केलेय.


चेन्नईच्या पहिल्या दोन्ही सामन्यावेळी कॅमेरामॅन कर्णधार ऋतुराज गायकवाडऐवजी धोनीकडेच फोकस करत असल्याचे दिसले. दोन्ही सामन्यात धोनीच अनेकदा फिल्डिंग सेट करताना दिसला. माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांसारख्या समालोचकांनी, ऋतुराजला कर्णधारपद देऊनही मैदानावर धोनीच कर्णधार असल्याबद्दल खिल्ली उडवली होती. असंच काहीसं दृश्य मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यानही पाहायला मिळालं. आता सामन्यानंतर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर यांनं सीएसकेच्या खेळाडूंच्या वतीनं स्पष्टीकरण दिलं आहे. 


दीपक चाहर काय म्हणाला ?


गुजरातविरोधात चेन्नईने एकतर्फी विजय मिळवला. विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज दीपक चहर यानं धोनीसह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाबद्दल एक मनोरंजक विधान केलं आहे. समालोचक सुनील गावसकरांनी सामन्यानंतर दीपक चाहर याच्यासोबत चर्चा केली. क्षेत्ररक्षणासाठी कोणाकडे पाहतो, असे गावसकरांनी चाहरला विचारले. त्यावर बोलताना दीपक चाहर म्हणाला की, "आजकाल फील्ड सेटिंग आणि बॉलिंग बदलांसाठी दोन्ही बाजूला पाहावं लागतं.  माहीभाई आणि ऋतुराज गायकवाड या दोघांकडेही फिल्डिंग बदलासाठी पाहावं लगातं. त्यामुळे कुठे पाहावं याबद्दल थोडा संभ्रम होतो. परंतु ऋतुराज चांगला कर्णधार आहे, तो बरंच काही शिकत आहे. "





 
चेन्नईचा गुजरातवर सहज विजय - 


चेपॉक स्टेडियमवर चेन्नईने गुजरातचा दारुण पराभव केला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल गुजरातचा संघ 142 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने 46 धावांची खेळी केली. तर शिवम दुबे याने अर्धशतक ठोकले.