हैदराबाद : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील  18 वी लढत पार पडली. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद  165 धावा केल्या होत्या. चेन्नईनं  हैदराबाद समोर विजयासाठी 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं.सनरायजर्स हैदराबादनं 6 विकेटनं चेन्नईला पराभूत केलं. हैदराबादनं 19 व्या ओव्हरमध्ये विजयावर नाव कोरलं.     


हैदराबादची आक्रमक सुरुवात


चेन्नई सुपर किंग्जच्या 165 धावांचा पाठलाग करताना हैदराबादनं आक्रमक सुरुवात केली. इम्पॅक्ट प्लेअर ट्रेविस हेडचा कॅच दुसऱ्याच बॉलवर मोईन अलीनं सोडला. मोईन अलीनं सोडलेला कॅच पुढं चेन्नईसाठी महागात पडला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जोरदार फटकेबाजी केली. अभिषेक शर्मानं 12 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. यानंतर ट्रेविस हेडनं देखील  3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 24 बॉलमध्ये 31 धावा केल्या.


एडन मार्क्रमनं 36 बॉलमध्ये चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 50 धावा केल्या. शहबाझ अहमदनं 1 सिक्स मारत 19 बॉलमध्ये 18 धावा केल्या. 


हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या बॉलर्सनी आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. चेन्नईसाठी यापूर्वीच्या मॅचमध्ये चांगली सुरुवात करुन देणारा रचिन रवींद्र मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. रचिन रवींद्र 12 धावा करु शकला. यानंतर चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड 26 धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांनी चेन्नईचा डाव सावरला. शिवम दुबे यानं  45, अजिंक्य रहाणे 35 आणि रवींद्र जडेजा 31 आणि डेरिल मिशेलनं 13 धावा केल्या. या धावांच्या जोरावर चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 165 धावा केल्या. पॅट कमिन्सनं शिवम दुबेला बाद करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही.


गुणतालिकेत फेरबदल


हैदराबादच्या विजयानं आयपीएलच्या गुणतालिकेत देखील फेरबदल झाले आहेत. हैदराबादनं चेन्नईविरोधात 6 विकेटनं विजय मिळवला. यामुळं सनरायजर्स हैदराबादनं गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानावर कायम  आहे. तर पंजाब किंग्ज सहाव्या स्थानावर गेलं आहे. 


संबंधित बातम्या


MS Dhoni : हैदराबादच्या प्रेक्षकांनी ज्याची वाट पाहिली तो क्षण आला, माही माहीचा जयघोष, धोनी ग्राऊंडवर येताच काय घडलं?


Video: मुंबईचे सलग तीन पराभव, हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात पूजा