IPL 2024 13th Match CSK vs DC Highlights: विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 171 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून आघाडीची फ्लॉप गेल्यानंतर तळाला धोनीने फटकेबाजी करत चाहत्यांचं मनोरंजन केले. धोनीने 16 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. दिल्लीने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली. तर चेन्नईचा पहिला पराभव झाला. दिल्लीकडून मुकेश कुमार यानं सर्वात भेदक मारा केला. मुकेश कुमार यानं तीन फलंदाजांना तंबूत धाडलं.
धोनीची वादळी फलंदाजी -
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीने प्रथमच फलंदाजी केली. धोनीने चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाचा समाचार घेतला. धोनीने 20 व्या षटकात 20 धावांचा पाऊस पाडला. धोनीने 16 चेंडूमध्ये नाबाद 37 धावांची खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. धोनीने 232 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. धोनीने रवींद्र जाडेजाच्या साथीने 23 चेंडूमध्ये 53 धावांची भागिदारी केली.
चेन्नईचे धुरंधर फेल -
दिल्लीच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईचे दिग्गज फलंदाज सपशेल अपयशी ठरले. खलील अहमद याने सुरुवातीलाच चेन्नईला दोन मोठे धक्के दिले. खलील अहमद यानं ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांना तंबूचा रस्ता दाखवला. गायकवाड 1 तर रविंद्र फक्त 2 धावा काढून बाद झाला. त्याशिवाय शिवम दुबे यालाही मोठी केळी करता आली नाही. दुबे 17 चेंडूमध्ये 18 धावा काढून बाद झाला. समिर रिझवी याला खातेही उघडता आले नाही.
रहाणे-मिचेल यांनी डाव सावरला -
7 धावांवर दोन विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिचेल या अनुभवी जोडीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला एकेरी दुहेरी धावा घेत धावसंख्या हालती ठेवली. जम बसल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी आक्रमक रुप धारण केले. अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिचेल यांनी 45 चेंडूमध्ये 68 धावांची भादिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. अजिंक्य रहाणे याने 30 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. तर डॅरेल मिचेल याने 26 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकारांचा समावेश आहे. त्याशिवाय तळाला रवींद्र जाडेजा याने 17 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये जाडेजाने दोन चौकार लगावले.
दिल्लीची गोलंदाजी कशी राहिली ?
दिल्लीकडून खलील अहमद यानं सुरुवातीला भेदक मारा केला. खलील अहमद याने पॉवरप्लेमध्येच चेन्नईला दोन धक्के दिले, त्यातून चेन्नईला सावरण्यासाठी मोठा वेळ लागला. त्यानंतर मधल्या षटकात अक्षर पटेल याने भेदक मारा करत धावा रोखल्या. त्याशिवाय डॅरेल मिचेल याला तंबूत धाडले. अखेरीस मुकेश कुमार याने तीन फलंदाजांना बाद केले. ईशांत शर्मा, नॉर्खिया, रासीख सलाम आणि मिचेल मार्श यांना एकही विकेट मिळाली नाही.