Tushar Deshpande on Fake News : वानखेडे मैदानावर शनिवारी चेन्नईने मुंबईचा दारुण पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मुंबईलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईला कमी धावसंख्येत रोखण्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. चेन्नईच्या या वेगवान गोलंदाजाने रोहित शर्मा आणि टीम डेव्हिडला तंबूचा रस्ता दाखवला. पण तुषार देशपांडे याचे रोहित शर्माबद्दलचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुषार देशपांडे याने रोहित शर्माबद्दल असभ्य शब्दात टिप्पणी केली. यावरुन त्याच्यावर टीका होत आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने याबाबत स्पष्टीकरण दिलेय.
 
 व्हायरल होणारे वक्तव्य काय ?


वानखेडेच्या मैदानावर तुषार देशपांडे याने भेदक मारा केला. त्याने रोहित शर्माचा जबरदस्त त्रिफाळा उडवला.  त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे एक वक्तव्य वाऱ्यासारखे व्हायरल झाले. यामध्ये काही प्रसारमाध्यमांनी बातम्याही केल्या. 'रोहित शर्माची विकेट घेणे सोपे आहे, तो विराट कोहली किंवा एबी डिव्हिलियर्ससारखा नाही' असे वक्तव्य तुषार देशपांडेचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशांतर्गत सामन्यात मुंबईकडून पदार्पण केल्यानंतर, तुषार देशपांडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक आहे. त्याने आयपीएलच्या 16 व्या हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे. 


तुषार देशपांडे काय म्हणाला ?


रोहित शर्माबद्दल व्हायरल होणाऱ्या वक्तव्याला तुषार देशपांडे याने फेक असल्याचे म्हटलेय. रविवारी रात्री इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये त्याने आपले मत व्यक्त केले. यामध्ये त्याने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या वक्तव्याचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला. त्याने पोस्टमध्ये म्हटले की, मी सर्व दिग्गज खेळाडूंचा सन्मान करतो. अशापद्धतीचे वक्तव्य मी केलेले नाही आणि यापुढेही कधी करणार नाही. अशा पद्धतीच्या फेक न्यूज पसरवणे बंद करा.. 






मुंबईविरोधात तुषार देशपांडेचा भेदक मारा - 


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना रंगला होता. यामध्ये तुषार देशपांडे याने भेदक मारा केला. तुषार देशपांडे याच्या भेदक माऱ्यामुळे मुंबईला सुरुवातीलाच धक्के बसले होते. त्यामुळे मुंबईच्या धावसंख्येला खीळ बसली. चेन्नईच्या या वेगवान गोलंदाजाने रोहित शर्मा आणि टीम डेव्हिडला तंबूचा रस्ता दाखवला. तुषार देशपांडे याने तीन षटकात 31 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. या सामन्यात मुंबईच्या संघाला फक्त 157 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईने हे आव्हान सहज पार केले.