CSK vs GT, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्यात सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पराभव झाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. पण पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली. गतविजेत्या गुजरात संघाने आयपीएल 2023 ची सुरुवातही विजयासह केली आणि चेन्नईचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला. मात्र, पराभवानंतरही धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या एका खेळाडूनं सर्वांच्या मनावर छाप पाडली आहे. 


CSK Rajvardhan Hangargekar in IPL 2023 : पराभवानंतरही CSK च्या खेळाडूची चर्चा


चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूनं तुफान गोलंदाजी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील राजवर्धन हंगरगेकरनं (Rajvardhan Hangargekar) याने चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. चेन्नईकडून खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट घेत दमदार कामगिरी केली. याआधी राजवर्धन हंगरगेकरने अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यानंतर आता राजवर्धनने चेन्नईसाठी तीन विकेट घेत संघासाठी चांगलं योजदान दिलं.






CSK Rajvardhan Hangargekar in IPL 2023 : राजवर्धन हंगरगेकरची तुफान गोलंदाजी


धाराशिवचा असणारा राजवर्धन हंगरगेकर यानं पहिल्याचं सामन्यात स्वत:ला सिद्ध केलं आहे. 30 लाख बेस प्राईज असताना तब्बल दीड कोटी रूपये मोजून चेन्नई सुपर किंग्सने त्याला संघात घेतलं आहे. यंदा त्याला प्लेईंग 11 मध्ये हंगरगेकरला संधी मिळाली. हंगरगेकर मागील आयपीएल हंगामातही चेन्नई संघासोबत होता मात्र, तो बेंचवर होता. पण यावेळी आयपीएल 2023 मध्ये हंगरगेकरला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. हंगरगेकरला पहिल्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवला.


CSK Rajvardhan Hangargekar in IPL 2023 : चार षटकांत तीन खेळाडू बाद


हंगरगेकरने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चार षटकांत 36 धावा देत तीन खेळाडू बाद केले. पहिल्या षटकात त्याची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याने एक नो बॉल टाकला. पण त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने शानदार सुरुवात करणाऱ्या रिद्धिमान साहाची विकेट घेत सीएसकेला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर त्याने साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनाही बाद केलं. पदार्पणाच्या सामन्यात हंगरगेकरने तीन विकेट घेत चेन्नईसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. दुसरीकडे दीपक चहरला एकही विकेट घेता आली नाही, तर तुषार देशपांडेने चार षटकांत 51 धावा दिल्या.


Who is Rajvardhan Hangargekar : 20 वर्षांचा धाराशिवचा गडी


राजवर्धन हंगरगेकर फक्त 20 वर्षांचा आहे. राजवर्धन तुळजापुर येथील माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू आहे. शिक्षण आणि क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी तो पुण्यात गेला. तिथे काही वर्ष मेहनत घेतली. भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजवर्धनने तीन वर्ष घाम गाळला. कोरोनाकाळातही त्यानं कसून सराव केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राजवर्धन हंगरगेकर अंडर 19 संघात सामील झाला. अंडर 19 संघात त्याने चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधलं.